मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक रणजित पाटील याचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी त्याने मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याच निधन झाल्याचं समोर आलं आहे. कोल्हापूरमध्ये राहत्या घरीच रणजित यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. रणजित पाटीलच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वात मोठी शोककळा पसरली आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून रणजीतच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
दिग्दर्शन, अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
गेल्या काही वर्षांपासून रणजीत पाटील हे मराठी मालिका, नाटक तसेच चित्रपट विश्वात सक्रीय होते. तसेच पाटील यांनी एकांकिका स्पर्धांमधून तरूण कलाकारांना प्रोत्साहन दिलं होतं. अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांनी नंतर तरूण रंगकर्मींना मार्गदर्शन तसेच प्रोत्साहन दिलं. याचा नक्कीच फायदा नव तरूणांना होतो. रणजीत पाटील यांनी रूईया महाविद्यालयातील एकांकिकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली होती.सध्या रणजीत पाटील अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचं दिग्दर्शन करत होते. दिग्दर्शन व्यतिरिक्त त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणंही खणखणीत वाजवलं. झी मराठीवरील ‘ह्रदय प्रीत जागते’, या मालिकेत रणजीत यांनी उत्तम अभिनय केला होता. त्यांच्या पात्राचं आणि अभिनयाचं कौतुकही झालं होतं.
रणजीत पाटलांच्या निधनाने कलाविश्वाची हानी
रणजित पाटीलच्या दिग्दर्शनात कायम नाविन्य असल्याचे दिसून आले आहे. चौकट मोडून काढण्याचा प्रयत्न त्याने आपल्या प्रत्येक दिग्दर्शनात केला आहे. त्याच्या दिग्दर्शनात माणसांच्या भावनांना केंद्रस्थानी ठेवणारी मांडणी त्याच्या दिग्दर्शनात आढळते. त्यामुळे त्याची प्रत्येक कलाकृती मनोरंजनाचं माध्यम न राहता समजाला विचार करायला भाग पडणार एक सुंदर कलाकृती मानली जाते. प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या जर तर ची गोष्ट’ या सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील रणजित पाटीनेच सांभाळली आहे. नुकताच या नाटकाचा ३०० वा प्रयोग देखील पार पडला.





