MP Breaking News
Mon, Dec 22, 2025

पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 48 लाखांच्या मद्यसाठा जप्त

Written by:Rohit Shinde
Published:
बेकायदेशीर मद्यतस्करीला रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात कंबर कसली आहे. पुणे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धडाकेबाज कारवाईत विभागाने तब्बल ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 48 लाखांच्या मद्यसाठा जप्त

महाराष्ट्रात बेकायदेशीर मद्य वाहतूक आणि तस्करीचे प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत आहे. कमी किमतीत जास्त नफा मिळवण्याच्या लालसेपोटी अनेक टोळ्या अवैध मद्यनिर्मिती व वाहतुकीत सक्रिय आहेत. यामुळे शासनाचा महसूल बुडतोच, पण नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. बनावट व निकृष्ट दर्जाच्या दारूमुळे अनेकदा जीवितहानीच्या घटना घडतात. सीमावर्ती जिल्ह्यांतून होणारी तस्करी रोखणे हे मोठे आव्हान बनले आहे. उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी कठोर कारवाई करणे, तपास यंत्रणा मजबूत करणे आणि नागरिकांनीही अशा गैरप्रकारांविरोधात जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. 31 डिसेंबरच्या काळात या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असतात.

पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परराज्यातून होणाऱ्या बेकायदेशीर मद्यतस्करीला रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात कंबर कसली आहे. पुणे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धडाकेबाज कारवाईत विभागाने तब्बल ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या रॅकेटमधील पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. औषधांच्या नावाखाली ट्रकमधून दारूची वाहतूक करण्याचा तस्करांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.

पहिली मोठी कारवाई १७ डिसेंबर रोजी सातारा-पुणे महामार्गावर सारोळा (ता. भोर) येथे करण्यात आली. गोव्याहून येणाऱ्या एका संशयित ट्रकमध्ये ‘औषधे’ असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, सासवड विभागाचे निरीक्षक संभाजी बर्गे आणि त्यांच्या पथकाने ट्रकची सखोल झडती घेतली. यावेळी औषधांच्या बॉक्सच्या मागे लपवून ठेवलेल्या १८६ विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. हा सर्व मद्यसाठा गोवा राज्य निर्मित असून महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे. या प्रकरणी ट्रक चालक संपत लक्ष्मण गावडे (रा. आंबेगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या घरातूनही जादा साठा जप्त करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई १३ डिसेंबर रोजी पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे करण्यात आली. ‘के’ विभागाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांच्या पथकाने एका आलिशान कारचा पाठलाग करून त्यात गोवा बनावटीच्या १३८ बाटल्या जप्त केल्या. या कारवाईत केवळ चालकालाच नाही, तर तपासाची चक्रे वेगाने फिरवून मद्य पुरवठादार राजू केकान आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हनुमंत रोकडे यालाही बेड्या ठोकल्या आहेत. याशिवाय आंबेगाव बुद्रुक परिसरात छापा टाकून समीर राऊत यालाही अटक करण्यात आली आहे.

मद्य तस्करीमुळे उत्पादन शुक्ल विभागाचे नुकसान

मद्य तस्करीमुळे राज्यातील उत्पादन शुल्क विभागाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. बेकायदेशीर मद्यनिर्मिती व वाहतुकीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतो. याचा थेट परिणाम विकासकामे, सामाजिक योजना आणि सार्वजनिक सेवांवर होतो. तस्कर करचुकवेगिरी करून स्वस्त दरात दारू विकतात, त्यामुळे कायदेशीर व्यावसायिकांनाही तोटा सहन करावा लागतो. उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने छापे आणि कारवाया होत असल्या तरी वाढती तस्करी मोठे आव्हान ठरत आहे. कडक कायदे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सीमावर्ती तपास वाढवणे आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळेच या बेकायदेशीर साखळीला आळा घालता येईल. त्यामुळे आता उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे.