MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

पुण्यातील मेट्रो स्थानकांची नावे अचानक बदलली; तीन स्थानकांची नवी नावे जाणून घ्या !

Written by:Rohit Shinde
Published:
पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे अचानक बदलण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी आणि काही सामाजिक संघटनांकडून ठरावीक मेट्रो स्थानकांची नावं बदलण्याची मागणी केली होती.
पुण्यातील मेट्रो स्थानकांची नावे अचानक बदलली; तीन स्थानकांची नवी नावे जाणून घ्या !

पुणे मेट्रो हे शहराच्या वाढत्या वाहतूक समस्यांवर प्रभावी उपाय ठरत आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि सततची कोंडी लक्षात घेता मेट्रो ही जलद, सुरक्षित व वेळेची बचत करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. प्रवाशांना दैनंदिन प्रवासात आराम, शिस्तबद्ध वेळापत्रक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा लाभ मिळतो. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी यांच्यासाठी मेट्रो अत्यंत उपयुक्त ठरते. इंधन खर्चात बचत होऊन पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. पुणे मेट्रोमुळे शहरातील वाहतूक सुलभ होत असून आर्थिक व सामाजिक विकासालाही गती मिळत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील तीन मेट्रो स्थानकांची नावे अचानक बदलण्यात आली आहेत. लोकप्रतिनिधी आणि काही सामाजिक संघटनांकडून ठरावीक मेट्रो स्थानकांची नावं बदलण्याची मागणी केली होती.

तीन मेट्रो स्थानकांच्या नावात बदल 

मंडई, नळस्टॉप आणि आयडियल कॉलनी अशा तीन मेट्रो स्थानकाचं नाव बदलण्यात आलं आहे. नेमके मेट्रो स्थानकांना काय नाव दिले आहेत ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या तीन स्थानकांची नावं बदलण्यात आली आहेत. मंडई मेट्रो स्थानकाचं नाव बदलून ‘महात्मा फुले मंडई’ करण्यात आलं आहे. नळस्टॉप स्थानकाच नाव बदलून ‘एसएनडीटी’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. तर आयडियल कॉलनी स्थानकाचं नाव ‘पौड फाटा’ असं करण्यात आलं आहे. पुढील काही दिवसांत सर्व मेट्रो स्टेशनवरच्या नेमप्लेट्स बदलण्याचं काम पूर्ण होईल, असं मेट्रो प्रशासनानं सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून मेट्रो स्टेशनच नाव बदलण्याची मागणी केली जात होती. अखेर ती मागणी आता पूर्ण झाली आहे.

मेट्रो स्थानकांची नावं का बदलली ?

लोकप्रतिनिधी आणि काही सामाजिक संघटनांकडून ठरावीक मेट्रो स्थानकांची नावं बदलण्याची मागणी केली होती. महात्मा फुले मंडई परिसरातील स्थानकाचं नाव बदलून ‘महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक’ करण्यात यावं, अशी आग्रही मागणी केली जात होती. माळी महासंघ या सामाजिक संघटनेने याबाबत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे (महामेट्रो) निवेदन दिलं होतं. शिवाय, आंदोलनाचाही इशारा दिला होता. वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरील नळस्टॉप आणि आयडियल कॉलनी स्थानकांचं नावही बदलण्यात आलं. नळस्टॉपचं स्थानक ‘एसएनडीटी कॉलेज’जवळ असल्याने या स्थानकाला हेच नाव दिलं आहे. या मेट्रो स्थानकांच्या नव्या नामकरणावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केला आहे, अशी माहिती ‘महामेट्रो’तर्फे देण्यात आली. अखेर, मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याविषयी शिक्कामोर्तब झाल्यावर सामाजिक संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला.