मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत याबाबत मोठी घोषणा केली होती. त्यानुसार, 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 ला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राज्यातील 29 महापालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महापालिका निवडणुकीसाठी वेगळीच रणनिती आखल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना उमेदवाराची चाचणी करत असताना 70% नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला या निर्णयाचा फायदा होणार की नुकसान हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे 70% नवे उमेदवार देणार ?
राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून दिग्गज नेतेही मैदानात उतरले आहे. अशातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पहिल्यांदाच या निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, याच अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेनं नवी रणनीती आखल्याची माहिती आहे. ठाकरेंची शिवसेना उमेदवाराची चाचणी करत असताना 70% नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आहे. युवा सेनेतील अनेक चेहऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवले जाणार आहे.
ठाकरेंचे युवा चेहरे यशस्वी होणार ?
सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेकडे एकूण 51 माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे या माजी नगरसेवकांचा विचार करून अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेत असल्याची माहिती आहे. यात अंकित प्रभू, पवन जाधव, सुप्रदा फातर्फेकर, शीतल शेठ देवरुखकर, साईनाथ दुर्गे, राजोल पाटील यासारख्या अनेक युवा चेहऱ्यांची नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. काहींना तयारीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तर काहींच्या बाबत निर्णय येत्या दोन ते चार दिवसात अपेक्षित आहे, अशी देखील माहिती आहे. त्यामुळे ठाकरेंचे युवा चेहरे यशस्वी होणार का ते पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.





