MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Weather Update: महाराष्ट्रातील थंडीत काहीशी घट; किमान तापमान 10 ते 13 अंशांच्या दरम्यान स्थिरावले!

Written by:Rohit Shinde
Published:
आज 17 डिसेंबर रोजी राज्यात प्रामुख्याने स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व उपविभागांमध्ये सकाळच्या वेळेत धुक्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
Weather Update: महाराष्ट्रातील थंडीत काहीशी घट; किमान तापमान 10 ते 13 अंशांच्या दरम्यान स्थिरावले!

महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरली असली तरी राज्यात आलेली तीव्र कडाका कायम आहे. किमान तापमानात वाढ होत असून काही ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. बुधवारी देखील राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने आज राज्यात आज गारठा कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज 17 डिसेंबर रोजी राज्यात प्रामुख्याने स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्व उपविभागांमध्ये सकाळच्या वेळेत धुक्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

उत्तरेकडील थंड वारे मंदावले; तरी गारठा कायम

राज्यातील थंडीबाबत आता हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर येत आहे. 17 डिसेंबरपासून महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवू लागला असून गेल्या आठवड्यातील कडाक्याच्या थंडीचा जोर आता कमी झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार थंड वाऱ्यांचा प्रभाव घटल्याने किमान तापमान स्थिरावले आहे. सकाळी व रात्री हलका गारवा जाणवेल, तर दुपारच्या वेळेत तापमान वाढून हवामान उबदार राहणार आहे.

राज्यात मंगळवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात सर्वात कमी म्हणजेच 5.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 6.5 अंश, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 7.2 अंश, तर जेऊर येथे 7.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. अहिल्यानगर, नाशिक आणि गोंदिया येथे तापमान 9 अंशांच्या खाली राहिले, तर मालेगाव, पुणे, नागपूर, भंडारा आणि यवतमाळ येथे किमान तापमान 10 अंश किंवा त्याहून कमी नोंदले गेले.

कोकण विभागात डिसेंबर महिन्यात थंड आणि कोरडे हवामान राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आज ठाणे, मुंबई आणि पालघर परिसरात थंडी कायम राहण्याची शक्यता असून काही भागांत सकाळच्या वेळी दाट धुके दिसू शकते. मध्य महाराष्ट्रात पुणे शहरासह अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळी धुक्याची शक्यता असून रात्रीच्या वेळेत थंडी अधिक जाणवेल. मराठवाडा विभागातही हवामान कोरडे राहणार असून तापमानात किरकोळ फरक जाणवू शकतो. विदर्भात फारसा बदल अपेक्षित नसला, तरी सकाळ आणि रात्रीच्या वेळेत नागरिकांनी थंडीपासून काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !

सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते.

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.