कांदा आयात आणि निर्यात, निर्यात निर्बंध, नाफेड आणि एनसीसीएफ बफर स्टॉक आणि किंमत नियंत्रण यासंबंधीचे सर्व निर्णय शेतकऱ्यांशी सल्लामसलत न करता घेतले जात होते. मात्र आता हे सर्व निर्णय शेतकरी नेतृत्वाखाली आणि त्यांच्या हितासाठी घेतले जातील. कारण आता भारतातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन आपल्या महाराष्ट्रात उभारले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे हे कांदा भवन उभारण्यात येईल. राष्ट्रीय कांदा भवन सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जयगाव येथे दोन एकर जागेवर उभारण्यात येईल. आणि भविष्यात गरजेनुसार त्याचा विस्तार केला जाईल.
सिन्नरमध्ये राष्ट्रीय कांदा भवनाची निर्मिती होणार !
भारत जगातील आघाडीचा कांदा उत्पादक देश असूनही, आतापर्यंत कांदा आयात आणि निर्यात, निर्यात निर्बंध, नाफेड आणि एनसीसीएफ बफर स्टॉक आणि किंमत नियंत्रण यासंबंधीचे सर्व निर्णय शेतकऱ्यांशी सल्लामसलत न करता घेतले जात होते. या बाबी आता बदलणार आहेत. कारण, आता भारतातील पहिले राष्ट्रीय कांदा भवन आपल्या महाराष्ट्रात उभारले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे हे कांदा भवन उभारण्यात येईल. त्यामुळे कांद्याचे संपूर्ण अर्थकारण आता सिन्नरमधून नियंत्रित होणार आहे.
कांदा भवनामुळे उपलब्ध होणाऱ्या सुविधा-फायदे
विपणन व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवण्याचाही या प्रकल्पाचा उद्देश आहे. राज्य आणि राष्ट्रीय कृषी बाजार समित्यांमधील कांदा व्यापार व्यवहार अधिक पारदर्शक केले जातील. शेतकऱ्यांची फसवणूक, दलालांचे वर्चस्व आणि भावातील कृत्रिम चढ-उतार रोखण्यासाठी थेट विक्री साखळी उभारली जाणार आहे. या साखळीमुळे शेतकरी थेट राष्ट्रीय कांदा भवनाशी, तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी जोडले जातील. परिणामी शेतकऱ्यांना सातत्यपूर्ण आणि वाजवी दर मिळतील, तर ग्राहकांनाही स्थिर भावात कांदा उपलब्ध होईल.
या भवनाचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे कांदा बियाण्यांवरील संशोधन आणि गुणवत्ता नियंत्रण. कांदा उत्पादनात दर्जेदार बियाणे, योग्य रोपवाटिका, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रण या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. राष्ट्रीय कांदा भवनाच्या माध्यमातून बियाण्यांचे संशोधन, रोपवाटिका व्यवस्थापन, पेरणीनंतरच्या प्रक्रियांचे वैज्ञानिक नियोजन आणि संपूर्ण पीक देखरेख करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढेल.
शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी अनेक सोयी-सुविधा
शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी खत, कीटकनाशके आणि इतर निविष्ठांची एकत्रित खरेदी करण्यात येणार आहे. सामूहिक खरेदीमुळे दर कमी होतील आणि छोट्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल. या सर्व प्रक्रिया सहकार्याच्या तत्त्वावर आणि पारदर्शक पद्धतीने राबवल्या जातील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. ष्ट्रीय कांदा भवनात शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, अधिकारी आणि धोरणकर्त्यांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच बैठका आणि परिषदांसाठी हॉल, संगणक व इंटरनेट सुविधा तसेच आधुनिक कांदा चाचणी प्रयोगशाळाही उभारली जाणार आहे.





