Manikrao Kokate Resign : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सदनिका घोटाळा प्रकरणातील शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवल्यानं कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यापूर्वीच कोकाटे यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कोकाटे यांचं मंत्रिपद काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती. आता माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाते अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे बोलले जाते..
कोकाटे बिनखात्याचे मंत्री (Manikrao Kokate Resign)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंचं मंत्रीपद काढून घेतलं आहे. माणिकराव कोकाटेंकडे असलेली क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग ही खाती अजित पवारांकडे सोपवली गेली आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटे आता बिन खात्याचे मंत्री बनले आहेत. एकीकडे मंत्रीपद तर गेलंच…आणि दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात पोलिसांनी अटक वॉरंट जारी केल्याने कोणत्याही क्षणी त्यांना अटक सुद्धा होऊ शकते. अटक झाल्यास माणिकराव कोकाटे यांची आमदारकीहि रद्द होण्याची शक्यता आहे. Manikrao Kokate Resign
कोकाटेना कोणत प्रकरण भोवलं?
मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या १० टक्के कोट्यातून लाटलेल्या चार सदनिकांच्या घोटाळ्यात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. बदर यांनी अंतिम सुनावणीत दोषी धरले आहे. नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या.





