MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

BMC Election 2026 : अजित पवारांकडून भाजपला ठेंगा!! BMC निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

Published:
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपला ठेंगा दाखवत मुंबई महापालिका निवडणूक नवाब मलिक यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे
BMC Election 2026 : अजित पवारांकडून भाजपला ठेंगा!! BMC निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय

BMC Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपला ठेंगा दाखवत मुंबई महापालिका निवडणूक नवाब मलिक यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणूक लढवणार असाल तर आम्ही तुम्हाला महायुतीत घेणार नाही अशी भूमिका भाजपने घेतल्यानंतरही अजित पवारांनी नवाब मलिकांवरील विश्वास कायम ठेवला आहे. त्यामुळे त्यांनी भाजपच्या विरोधाला बगल देत नवाब मलिक यांच्याकडे राष्ट्रवादीने मुंबईची जबाबदारी दिली आहे.

नवाब मलिक यांना भाजपचा विरोध का?? BMC Election 2026

नवाब मलिक यांच्यावर दहशतवादाची आरोप असल्याने भाजपचा सुरुवातीपासूनच त्यांना विरोध आहे. नवाब मलिक यांना 2022 मध्ये अटक करण्यात आली होती, आणि ते सध्या जामिनावर आहेत त्यामुळे भाजप त्यांच्याशी जुळवून घ्यायला तयार नाही. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असतानाही भाजपने मलिक यांना कडाडून विरोध केला होता, नंतरच्या काळात अजित पवारांनी सवता सुभा मांडल्यानंतर नवाब मलिक दादा गटात गेले. तेव्हाही कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांच्याशी तडजोड करायची नाही अशी भूमिका भाजपने घेतली होती.

भाजपच्या भूमिकेला दादांचा ठेंगा

आताही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गट महापालिका निवडणूक (BMC Election 2026) लढवणार असेल तर मुंबईत आम्ही त्यांच्याशी युती करू शकत नाही अशी स्पष्ट भूमिका भाजपने घेतली होती. मात्र भाजपच्या या भूमिकेला न जुमानता अजित पवारांनी नवाब मलिक यांच्या खांद्यावरच मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. एकप्रकारे अजित पवारांनी भाजपला ठेंगाच दाखवला आहे असं म्हणावं लागेल. अजित पवार यांच्या या भूमिकेनंतर भाजपकडून आता काय प्रतिक्रिया येथे हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान, भाजपचा नवाब मलिक यांना विरोध हे केवळ ढोंग आहे. नवाब मलिकांची मुलगी सरकारला पाठिंबा देते. मग ते आता का चालत नाहीत? असा सवाल करत नवाब मलिक हा अजित पवार यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजपनं हे ढोंग करू नये अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच केली होती.