पिंपरी-चिंचवड शहरासाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवा प्रदूषणाची पातळी सातत्याने धोकादायक पातळी ओलांडत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक अनेक दिवस ‘खराब’ श्रेणीत राहिला.यामुळे पिंपरी-चिंचवडची गणना महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये झाली आहे.
पिंपरी-चिंचवडची हवा विषारी; आरोग्याला धोका
पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात वाढत चाललेले हवा प्रदूषण हा खरोखरच गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. वाढत्या औद्योगिक प्रकल्पांमुळे, आरएमसी प्लांट्स, बांधकाम कामांमधून निर्माण होणाऱ्या धुळकणांमुळे आणि वाहतुकीतील वाढत्या धूर उत्सर्जनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या वाढत चालल्या आहेत. प्रशासनाने काही कारवाई सुरू केली असली तरी प्रदूषण नियंत्रणासाठी कडक नियमांची गरज आहे. महापालिकेकडून आता अनेक आस्थापनांवर कारवाईचा धडका सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी यांच्यामार्फत शहरात एकूण २८ ठिकाणी हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाते. अलीकडील नोंदीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्राने सर्वाधिक प्रदूषणाची पातळी नोंदवली आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात (१४ दिवसांपैकी) तब्बल सात दिवस शहराचा AQI २०० अंकांची मर्यादा ओलांडून ‘अतिशय खराब’ श्रेणीत पोहोचला होता. बांधकाम आणि धूळ: शहरातील अनियंत्रित बांधकाम प्रकल्प, रेडी-मिक्स काँक्रिट (RMC) प्लांट्समधून होणारे उत्सर्जन आणि रस्त्यांवरील धूळ हवेत मोठ्या प्रमाणावर मिसळून PM 10 कणांचे प्रमाण वाढवत आहेत.
महापालिकेकडून काही आरएमसी प्लांट्सवर कारवाई
काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड भागातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. यामुळे महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. प्रदूषणाला रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पही कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताथवडे, पुनावळे, पिंपळे, निलख आणि मोशी परिसरातील नऊ आरएमसी प्रकल्पांना टाळे ठोकले आहेत. तसेच वायुप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केल्याबद्दल आणखी 30 प्रकल्पांवर कारवाई करण्यात येणार आहे.
उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा विकास झपाट्याने होत आहे. हा विकास होत असतानाही पर्यावरणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्रकल्पांसाठी अत्यंत कठोर नियम घालून दिले आहेत, पण अनेक प्रकल्प चालवणारे या नियमांचे उल्लंघन करत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायुप्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील 30 प्रकल्पांची यादी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिली आहे. शहरातील पर्यावरणविषयक समस्या आणि तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महापालिकेने दोन तपासणी पथकांची नेमणूक केली आहे.





