Budget 2026 : देशाच्या आर्थिक दिशेला कलाटणी देणारा दिवस आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, कष्टकरी, नोकरदार वर्ग, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांसह शिक्षण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राचं लक्ष लागलेलं आहे. कोणाला दिलासा मिळणार? कोणावर खर्च वाढणार? काय महाग होणार आणि काय स्वस्त? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या अर्थसंकल्पातून मिळणार आहेत.
किती वाजता सुरू होणार Budget 2026
दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी ठीक ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पीय भाषण देतील. हे भाषण साधारणतः ६० ते ९० मिनिटांचं असण्याची शक्यता आहे. भाषणानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित सर्व कागदपत्रे लोकसभा आणि राज्यसभेत सादर केली जाणार आहेत. आता प्रश्न असा आहे की, हा अर्थसंकल्प लाईव्ह कुठे आणि कसा पाहायचा? Budget 2026
कुठे पहाल थेट प्रक्षेपण
तर हा अर्थसंकल्प नवी दिल्लीतील संसद भवनातून थेट प्रसारित केला जाणार आहे. दूरदर्शनवर हा कार्यक्रम डीडी न्यूज आणि संसद टीव्हीवर थेट पाहता येईल. तसेच, संसद टीव्ही आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) इंडियाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर सुद्धा हा अर्थसंकल्प लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. याशिवाय, indiabudget.gov.in या सरकारी वेबसाइटवरही सकाळी ११ वाजल्यापासून थेट प्रसारण उपलब्ध असेल. विशेष म्हणजे, भाषण सुरू होण्याच्या काही मिनिटे आधीच लाईव्ह स्ट्रीम सुरू केली जाईल, त्यामुळे प्रेक्षकांना आधीच कनेक्ट होता येईल.
जर काही कारणास्तव तुम्हाला अर्थसंकल्प लाईव्ह पाहता आला नाही, तरी काळजी करण्याचं कारण नाही. कारण संसद टीव्ही आणि PIB च्या यूट्यूब चॅनेलवर संपूर्ण भाषण नंतरही पाहता येणार आहे.





