उद्यापासून तंबाखू सिगारेट महागणार! ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका

Published:
वृत्तसंस्था PTI च्या माहितीनुसार, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जाईल, तर पान मसाल्यावर ‘आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर’ लावण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हे सर्व कर ४० टक्के कमाल GST दराव्यतिरिक्त असतील
उद्यापासून तंबाखू सिगारेट महागणार! ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका

१ फेब्रुवारीपासून तंबाखू आणि त्यासंबंधित उत्पादनांचा वापर करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण केंद्र सरकारने या आरोग्यासाठी घातक असलेल्या उत्पादनांवरील कर रचनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून तंबाखूजन्य उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि नवीन उपकर लागू करण्यात येत आहे.

सुधारित GST दर जरी सप्टेंबर २०२५ पासून लागू झाले असले, तरी तंबाखू, गुटखा आणि पान मसाल्यावरच्या विशेष कर तरतुदी १ फेब्रुवारी २०२६ पासून अंमलात येणार आहेत. वृत्तसंस्था PTI च्या माहितीनुसार, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जाईल, तर पान मसाल्यावर ‘आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर’ लावण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हे सर्व कर ४० टक्के कमाल GST दराव्यतिरिक्त असतील. याआधी या उत्पादनांवर २८ टक्के GST आणि भरपाई उपकर आकारला जात होता, मात्र आता नवी आणि अधिक कठोर कर प्रणाली लागू होत आहे.

MRP-आधारित किंमत प्रणाली लागू

१ फेब्रुवारीपासून चघळणारा तंबाखू,  फिल्टर खैनी,  जर्दा-युक्त तंबाखू आणि गुटखा या सर्व उत्पादनांसाठी MRP-आधारित किंमत प्रणाली लागू केली जाणार आहे. आता पॅकेटवर छापलेल्या कमाल किरकोळ किमतीच्या आधारेच GST आकारला जाईल. सरकारचा दावा आहे की, यामुळे करचोरी थांबेल आणि सरकारी महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल.

पान मसाला उत्पादकांवर कडक कारवाई

नव्या नियमांनुसार, पान मसाला उत्पादकांना आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर कायद्यानुसार नवीन नोंदणी करावी लागेल. इतकंच नाही तर, सर्व पॅकिंग मशीन्सवर CCTV प्रणाली बसवणं बंधनकारक असेल. या CCTV फुटेजचे रेकॉर्डिंग किमान २४ महिने जतन करावे लागणार आहे.