वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्रीपद काढून त्यांना इतर खाते दिले जाण्याची शक्यता आहे. अशात कृषीखाते मिळविण्यासाठी धनंजय मुंडे लॉबिंग करत असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री दत्ता भरणे आणि मकरंद पाटील या दोन मंत्र्यांकडे असलेली खाती कोकाटे यांना दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याची जबाबदारी दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील या दोघांपैकी एकाला मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत आता राजीनामा दिलेले मंत्री धनंजय मुंडे कृषी खात्यासाठी पुन्हा एकदा लॉबिंग करत असल्याची माहिती समोर येत आहे, यावर आमदार सुरेश धसांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
धनंजय मुंडेंना कृषीखाते मिळणार?
धनंजय मुंडे देखील कृषी खात्यासाठी उत्सुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंडेंना पु्न्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल का असा प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. धनंजय मुंडे यांच्यावर सध्या अनेकांकडून आरोप होत आहेत. काल भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुंडे यांना कृषीशी निगडीत खरेदी या एकाच प्रकरणात दिलासा मिळालेला आहे. धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्या काळात भ्रष्टाचार झालेला आहे.
मुंडेंना मंत्रीपद देऊ नका -सुरेश धस
या प्रकरणावर बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, ” मला वाटत नाही धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळणार. मंत्रिपदासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहे पण त्यांना पुन्हा सरकारमध्ये घेतले तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. बीड जिल्ह्यातील बापू आंधळे प्रकरण पेंडिंग आहे. गित्ते हत्या प्रकरणात तपास बाकी आहे. अजून देखील काही फाईल्स उघडल्या पाहिजेत. बालाजी मुंडेंची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणात त्यात ड्रायव्हरला आरोपी करण्यात आले” असल्याचा दावा देखील आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना केला.
त्यांनी आगामी काळात धनंजय मुंडेंना कृषीमंत्रीपद देण्यासारखी परिस्थिती राज्यात निर्माण झाली, तर आमदार सुरेश धसांकडून या मुद्द्यावर तीव्र विरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात नेमके काय घडते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





