ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात मंडल यात्रा काढण्यात येत आहे. क्रांती दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट पासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी नागपूरमध्ये हिरवा झेंडा दाखवून राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेची सुरुवात केली. दरम्यान, शरद पवार यांनी काढलेल्या मंडल यात्रेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. ओबीसी समाजाचे आंदोलक नेते लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवर शेलक्या शब्दांत टीका केल्याने आगामी काही दिवसांत हा वाद आणखी शिगेला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शरद पवारांचा ‘इच्छाधारी नाग’ उल्लेख
“शरदचंद्र पवार साहेबांनी आता ओबीसींची झुल पांघरली आहे. नागपूरमधून मंडल यात्रा सुरु केली आहे. इच्छाधारी नागाप्रमाणे भूमिका बदलण्यात शरद पवार पटाईत आहेत. मनोज जरांगेंना मांडीवर घेवून गोंजारनारे शरद पवार अचानक ओबीसींची बाजू घेण्याच्या तयारीत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते ओबीसींचा विषय हाताळण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. पवारांची ही यात्रा म्हणजे जखम मांडीला आणि मलम ‘दुसरीकडे कुठंतरी….’ अशी परिस्थिती आहे. ही म्हण वापरण्याचं कारण म्हणजे ओबीसींना देशोधडीला लावणारा माणूस आज यात्रा काढतोय,” अशा शब्दांत लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवर टीका केली. त्यामुळे एकच वादळ उठले आहे.
शरद पवारांची जरांगेंना मदत -हाके
तर, शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट करतात ही त्यांची ख्याती आहे. म्हणजे पवारांनी ओबीसींसाठी मोर्चा काढला, याचा उलटा अर्थ म्हणजे त्यांना जरांगेंना मदत करायची आहे. ती कशी? कारण जरांगे २९ ऑगस्टला मुंबईला मोर्चा काढत आहेत. त्यांच्याविरोधात ओबीसींनी एकदिलानं ताकद दाखवू नये. ओबीसींमध्ये फुट पडावी. जरांगेंचा मोर्चा यशस्वी व्हावा. यासाठी शरद पवारांनी ही यात्रा काढली आहे का? हा मोर्चा काढावा म्हणून कोणता ओबीसी नेता त्यांच्या दारात गेला होता? याचं उत्तर शरद पवारांनी दिलं पाहिजे, असे प्रश्न सुद्धा लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांना विचारलं आहेत.
शरद पवारांचं आजवरचं राजकारण फोडा आणि राज्य करा असंच आहे. ओबीसींमध्ये फूट पाडून लाडक्या जरांगेचा हट्ट पुरवायचा आहे. हे न समजण्याइतका ओबीसी दुधखुळा नाही. येत्या निवडणूकीत शरद पवारांच्या फुटीतरतावादी राजकारणाला कायमचा पुर्णविराम लावण्याचं काम इथला जातीवंत ओबीसी करेल, हे नक्की असं हाके म्हणालेत. त्यामुळे पवारांवर नेहमीच हात माकड करणारे लक्ष्मण हाके यांनी आता राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेवर सुद्धा टीका केल्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. आगामी काळात या वादामुळे लक्ष्मण हाके अडचणीत येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.





