काँग्रेस नेते दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा बुधवारपासूनच राजकीय वर्तुळात जोर धरू लागली होती. अखेर आज डॉ. प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आज सकाळीच त्यांनी आपल्या विधान परिषद आमदारकीचा राजीनामा विधिमंडळाच्या सचिवांकडे सुपूर्द केला. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे.
प्रज्ञा सातवांचा अखेर भाजपात प्रवेश
काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताने कालपासून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आज सकाळी प्रज्ञा सातव यांनी विधिमंडळ सचिवांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द करत रितसर भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. प्रज्ञा सातव या काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची बातमी समोर आल्या क्षणापासून त्यांनी हा निर्णय का घेतला, असा एकच प्रश्न विचारला जात होता. त्यावर प्रज्ञा सातव यांनी विकासाचे कारण पुढे केले.
राजीव सातव यांचं हिंगोलीच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राच्या चौफेर विकासाला हातभार लावण्यासाठी मी आणि माझे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहोत, असे प्रतिपादन काँग्रेसच्या माजी आमदार प्रज्ञा सातव यांनी केले.
सातव परीवार आणि काँग्रेस संबंध
प्रज्ञा सातव सध्या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष आहेत आणि विधान परिषदेच्या आमदार आहेत. शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेतील जागेवर त्या २०२१ मध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मध्ये त्या दुसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून आल्या असून त्यांचा कार्यकाळ २०३० पर्यंत आहे. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. २०१४ मध्ये देशभरात मोदी लाटेत काँग्रेस भुईसपाट झाली होती. महाराष्ट्रातही काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यात राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे इतके घनिष्ठ संबंध असताना सातव काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे. तरी भाजपकडून अखेर या संबंधांना सुरूंग लावल्याचे स्पष्ट झाले आहे.





