मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आंदोलन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे-पाटलांवर सडकून टीका केली आहे. त्यामुळे दोघांमधील संघर्ष पुन्हा एकदा सुरू होणार असे दिसत आहे. नुकताच लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. काही मराठा नेत्यांना हाकेंनी टगे शब्द वापरल्याने वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर जोरदार टीका
“जरांगे हा लबाड कोल्हा आहे, त्यामुळे ओबीसीच्या लोकांनी ताट मानेने पुढे आले पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढत आहोत जरांगेने किती माणसं गोळा करायची काय करायचे ते त्याने करावे ओबीसी हे शांतपणे पहात आहेत. ओबीसीच्या तरुणांना आणि सगळ्या लोकांना हे समजत आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना माझं सांगणं आहे, ओबीसी शांत आहे ओबीसीचा आवाज दिसत नाही असं तुम्ही समजू नका.” अशा शब्दांत हाकेंनी टीका केली आहे.
ओबीसी बांधवांना विनंती आहे तुमचं ओबीसी आरक्षण घेऊन हे टगे आता निवडणुकीला उभे राहणार आहेत. कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसीमध्ये प्रवेश करणाऱ्यांना लक्ष्मण हाके यांनी “टगे ” हा शब्द वापरला. मराठ्यांच्या नेत्यांना हाके यांनी टगे शब्द वापरल्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
29 ऑगस्टला मुंबईत मोठे आंदोलन
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून सुरू होणार असून, तीन दिवसांनंतर मुंबईत आझाद मैदान व शासन दरबारी अर्थात मंत्रालयावर मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. जर आंदोलकांवर अन्याय झाला, तर गावागावातले मुख्य व दुय्यम रस्ते बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.





