NCP Manifesto: पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आघाडी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संयुक्त जाहीरनामा आज पुण्यातील शिवाजीनगर येथे प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
काय म्हणाले अजित पवार
या संयुक्त जाहीरनाम्यात पुणेकरांसाठी अष्टसूत्री विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचे आश्वासन म्हणजे मोफत मेट्रो आणि मोफत बस प्रवास. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, मोफत मेट्रो आणि बस सेवा शक्य आहे का, असा प्रश्न पुणेकरांना पडू शकतो. मात्र हे पूर्णपणे शक्य असून तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मोफत मेट्रो व बस प्रवास देऊन दाखवू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यासोबतच, दररोज नळाद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत अजित पवार म्हणाले की, जे शक्य आहे तेच मी बोलतो. पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक सेवा कोणत्याही शहरात तोट्यातच चालते, मात्र त्या तुलनेत मोफत प्रवासाचा खर्च फार मोठा नसतो. त्यामुळे मोफत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अमलात आणणे शक्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. NCP Manifesto
काय आहे राष्ट्रवादीचा जाहीरनामा – NCP Manifesto
दैनंदिन प्रवास सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी सर्वांसाठी मेट्रो आणि PMPML बस प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाईल.
सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
एप्रिल २०२६ पासून सर्व मध्यमवर्गीयांच्या मालकीची ५०० चौरस फुटांपर्यंतची घरे पूर्णपणे मालमत्ता करमुक्त केली जातील.
विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅब्लेट दिले जातील, जेणेकरून शिक्षण विनाअडथळा सुरू राहील.
लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वयंरोजगारासाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.





