Pune Metro : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादीने आज एकत्रितपणे आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात सर्वात गेमचेंजर घोषणा ठरली ती पुणेकरांच्या मोफत मेट्रो आणि बस सेवीची. महापालिका निवडणुकीत आमची सत्ता आल्यास आम्ही सर्व पुणेकरांना फुकट मेट्रो प्रवास आणि बस प्रवास देऊ अशी घोषणा अजित पवारांनी केली. दादांच्या या वाद्यामुळे विरोधात उभ्या असलेल्या भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र एखाद्या महानगरपालिकेला खरंच मेट्रो प्रवास मोफत करण्याचा अधिकार आहे का?? दादांनी जो वादा दिला आहे तो खरच पूर्ण होऊ शकतो का? चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
महामेट्रोच घेऊ शकते अंतिम निर्णय (Pune Metro)
अजित पवार यांनी जरी मोफत मेट्रो आणि बस सेवेचे आश्वासन दिले असले तरी मोफत मेट्रो प्रवासाचा निर्णय पुणे महापालिका घेऊ शकत नाही. घेतला, तरी तो अंतिम मान्यतेसाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठवावा लागणार आहे. मेट्रो चालविणाऱ्या महामेट्रोच्या संचालक मंडळात त्यावर अंतिम निर्णय होऊ शकतो. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे अर्थमंत्री सुद्धा आहेत . राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित दादांच्या हातात आहेत. अशावेळी पुणे मेट्रोसाठी ते विशिष्ट आर्थिक तरतूदही करू शकतात. Pune Metro
अजित पवार काय म्हणाले होते?
मोफत मेट्रो आणि मोफत बस प्रवास याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, मोफत मेट्रो आणि बस सेवा शक्य आहे का, असा प्रश्न पुणेकरांना पडू शकतो. मात्र हे पूर्णपणे शक्य असून तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना मोफत मेट्रो व बस प्रवास देऊन दाखवू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.





