MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

Shweta Shinde : लग्नासाठी मुलींना पाहिजे 2 BHK फ्लॅट; अवास्तव अपेक्षांवर श्वेता शिंदेची टीका

Published:
आजकाल अनेक मुली विवाहासाठी पात्र मुलाकडून थेट 2BHK फ्लॅटची अपेक्षा व्यक्त करतात. मात्र वयाच्या पंचवीसाव्या वर्षी एखाद्या तरुणाकडे स्वतःचं घर असणं शक्य नसतं. करिअरची सुरुवात, नोकरीतील स्थिरता, EMI, जबाबदाऱ्या या गोष्टींमुळे घर घेणे तेवढे सोपे नसते. त्यामुळे या मागण्या अवास्तव असल्याचं तिने स्पष्टपणे नमूद केलं
Shweta Shinde : लग्नासाठी मुलींना पाहिजे 2 BHK फ्लॅट; अवास्तव अपेक्षांवर श्वेता शिंदेची टीका

Shweta Shinde : श्वेता शिंदेच्या विधानावरून लग्न व्यवस्थेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात विवाह जुळवताना मुलांकडून आर्थिक अपेक्षा वाढल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. याच वास्तवावर भाष्य करत अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे हिने दिलेला सल्ला आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिचा मुलाखतीतील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी तिच्या मनमोकळ्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

काय म्हणाली श्वेता (Shweta Shinde)

श्वेताने सांगितलं की, आजकाल अनेक मुली विवाहासाठी पात्र मुलाकडून थेट 2BHK फ्लॅटची अपेक्षा व्यक्त करतात. मात्र वयाच्या पंचवीसाव्या वर्षी एखाद्या तरुणाकडे स्वतःचं घर असणं शक्य नसतं. करिअरची सुरुवात, नोकरीतील स्थिरता, EMI, जबाबदाऱ्या या गोष्टींमुळे घर घेणे तेवढे सोपे नसते. त्यामुळे या मागण्या अवास्तव असल्याचं तिने स्पष्टपणे नमूद केलं. ती म्हणाली की, एखाद्या मुलाकडे घर नसल्याने त्याला नकार देणे ही चुकीची प्रवृत्ती आहे. कारण अनेकदा मुलाच्या आई-वडिलांच्या पैशातून घर घेतलं जातं आणि त्या मुलीला ते ‘तयार घर’ मिळतं. परंतु त्या मालमत्तेत मुलाचं स्वतःचं कर्तृत्व नसतं. त्यामुळे हे समीकरण योग्य नाही. Shweta Shinde

एकत्र कष्ट करून नवीन घर घ्या

श्वेताने पुढे म्हटलं की, लग्न म्हणजे दोन व्यक्तींनी मिळून संसार उभारण्याचं नाव. एकत्र कष्ट करून स्वतःचं घर घेण्याचा आनंद वेगळाच असतो. घराच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या स्वभावाचा, जबाबदार, मेहनती आणि उत्तम कर्तृत्वाची क्षमता असलेला जीवनसाथी मिळणं जास्त महत्त्वाचं आहे. मुलींचे पालकही या अपेक्षांना खतपाणी घालतात, असं श्वेताचं मत आहे. तिने प्रश्न उपस्थित केला की, आज ज्या पालकांना मुलीच्या लग्नासाठी मुलाकडून घर हवं असतं, त्यांच्याकडे स्वतःच्या पंचविशीत घर होतं का? कार होती का? जर नव्हती तर अशा अपेक्षा लादणे चुकीचं आहे.

या मतावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी श्वेताच्या स्पष्टवक्तेपणाचं स्वागत करत, आजच्या पिढीच्या चुकीच्या अपेक्षा उघड केल्याचं म्हटलं. तर काही जणांनी लग्न हेच अंतिम स्वप्न नसल्याचं सांगत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन जीवन जगण्याची वृत्ती अधिक महत्त्वाची असल्याचं मत व्यक्त केलं. लग्न व्यवस्थेतील बदल, अपेक्षांचा वाढता बोजा, कर्तृत्वापेक्षा तयार सुखसोयींची मागणी यामुळे नाती ताणली जात असल्याचा मुद्दा या चर्चेतून पुढे आला आहे. श्वेताच्या वक्तव्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा खुली चर्चा सुरू झाली आहे.