Marathi News

लाडक्या बहिणींंसाठी गुड न्यूज; ऑगस्टमध्ये या दिवशी जमा होणार पैसे, आदिती तटकरेंनी तारीख सांगितली!

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यातील लाडक्या बहिणींची जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला 8 ऑगस्टला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.
लाडक्या बहिणींंसाठी गुड न्यूज; ऑगस्टमध्ये या दिवशी जमा होणार पैसे, आदिती तटकरेंनी तारीख सांगितली!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये 1500 इतकी रक्कम सन्मान निधी म्हणून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, जुलै महिना संपूनही त्या महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने लाभार्थींमध्ये अस्वस्थता होती.

रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला १,५०० येणार!

आता यावर स्पष्टता देताना मंत्री आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी, म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हा हप्ता वितरित केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. या निधीचे थेट लाभ हस्तांतरण लाभार्थींच्या बँक खात्यात करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट ! माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. अशी माहिती त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

अनेक लाडक्या बहिणी अपात्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या वर्षी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. जून महिन्यात या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले. योजनेचा पहिला लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख बहिणींना मिळाला होता, त्यानंतर ही संख्या कमी-जास्त होत गेली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानूसार आजवर अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत.

सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला? 

सामाजिक न्याय विभागाला आता कोण न्याय देणार? असा सवाल विचारण्यात येत आहे. या खात्याचा निधी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याखात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी इतका विरोध करून, खदखद व्यक्त करून आणि नाराजी जाहीर करूनही निधी वळवण्यात आला. विशेष म्हणजे कालच अजितदादा आणि मंत्री शिरसाट यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतरही हा निर्णय घेतल्याने शिरसाट नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews