राज्यातील कृषी बाजारात शेतमालाच्या दरांमध्ये दररोज चढ-उतार होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे बाजारातील आवकही कमी-जास्त होत आहे. आज 19 डिसेंबर, शुक्रवार रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये सोयाबीन आवक घटलेली असून, बहुतांश ठिकाणी दरातही घसरण नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र काहीसे चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले.
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी चांगल्याचा वाढत आहेत. कारण बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनचे आवक नियमित नसल्याने कधी माल जास्त येतो तर कधी कमी, यामुळे बाजारभावामध्ये कमालीची अस्थिरता सध्या पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी 7 हजारांच्या पार पोहोचलेला दर आता 5 हजारांच्या आत आल्याचे दिसते. परिणामी शेतकऱ्यांमध्ये सध्या कमालीची चिंता पाहायला मिळत आहे.
राज्यभरात दराची काय स्थिती ?
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज सोयाबीनची एकूण आवक 30 हजार 718 क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. सोयाबीनची सर्वाधिक आवक अमरावती बाजारात झाली. अमरावती मार्केटमध्ये आलेल्या 5 हजार 238 क्विंटल सोयाबीनला 4000 ते 4400 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. दरम्यान, सातारा बाजारात आवक झालेल्या 56 क्विंटल सोयाबीनला 5328 रुपये प्रतिक्विंटल असा आजचा सर्वाधिक दर मिळाला. मात्र गुरुवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात काहीशी घट झाल्याचे दिसून येत आहे.





