Mon, Dec 29, 2025

Air Pollution: मुंबई-पुण्यात हवा प्रदुषण धोकादायक पातळीवर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई आणि पुण्यातील हवा प्रदुषण आता चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. नागरिकांच्या आरोग्याला यामुळे धोका संभवतो. अशा परिस्थितीमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी सर्वांना घ्यावी लागणार आहे.
Air Pollution: मुंबई-पुण्यात हवा प्रदुषण धोकादायक पातळीवर; नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या संपूर्ण परिस्थितीतमुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने धुक्यासारखी दिसणारी ही प्रदूषणाची चादर शहरावर पसरली आहे. पुण्यात देखील सध्या परिस्थिती फार काही वेगळी नाही. २०२५ या संपूर्ण वर्षात हवा प्रदूषणाच्या आकडेवारीने मोठी चिंता वाढवली आहे.

हवा प्रदुषण धोकादायक पातळीवर

सोमवारी मुंबईचा AQI 133 इतका होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार पुण्यात शुक्रवारी 220, शनिवारी 222 आणि रविवारी 232 इतका एक्यूआय नोंदवण्यात आला. या पातळीवरील हवेत दीर्घकाळ राहिल्यास केवळ आजारीच नव्हे, तर निरोगी व्यक्तींनाही श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि घशात कोरडेपणा जाणवू शकतो. ही पातळी दमा, फुफ्फुसांचे विकार आणि हृदयरोग असलेल्या नागरिकांसाठी श्वसनास त्रासदायक ठरू शकते.

मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये वाढती लोकसंख्या, वेगवान शहरीकरण आणि सातत्याने सुरू असलेली बांधकामे यांचा थेट परिणाम आता हवेवर होत आहे. सकाळची ताजी हवा मिळणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. शहरातील वातावरण दिवसेंदिवस अधिक प्रदुषित होत आहे. याचा परिणाम प्रामुक्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारांनी त्रस्त व्यक्तींवर होत आहे. या व्यक्तींसाठी हे वाढते प्रदूषण धोक्याची घंटा आहे. मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये हवा प्रदूषणाची पातळी चिंताजनक असून ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ (AQI) चिंताजनक स्थितीत पोहोचला आहे.

मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरातही अशा उच्च प्रदूषणाची नोंद होत असल्याने, स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. पुण्यातही वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांचे वाढते उत्सर्जन, बांधकाम प्रकल्प आणि कचरा जाळणे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जातात.  मुंबई, पुणेकरांनी देखील आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाढणारे हवा प्रदूषण चिंतेची बाब

वाढणारे हवा प्रदूषण हे आजच्या आधुनिक जीवनातील सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. औद्योगिकीकरण, वाहनांची वाढ, धूळकण, कारखान्यातून निघणारा धूर आणि कचरा जाळणे यामुळे शहरांमध्ये हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, दमा, हृदयविकार, डोळ्यांचे आजार आणि दीर्घकाळात कर्करोगासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात.

तसेच पर्यावरणीय समतोल बिघडून हवामान बदलाची गती वाढते. स्वच्छ हवा ही प्रत्येक माणसाचा हक्क आहे, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर, वृक्षारोपण, हरित ऊर्जा आणि नागरिकांची जबाबदारी या सर्वांनी मिळून प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न करणे आवश्यक आहे.