MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

राज्यात भाजपातील इनकमिंग वाढलं, 2029 साठी भाजपा स्वबळाच्या तयारीत?

Written by:Smita Gangurde
Published:
2029 साली स्वबळावर राज्यात भाजपाची सत्ता येण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसह मित्रपक्षांचे आमदार, माजी आमदारही गळाला लावण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.
राज्यात भाजपातील इनकमिंग वाढलं, 2029 साठी भाजपा स्वबळाच्या तयारीत?

मुंबई- भाजपा 2029 विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात स्वबळाची तयारी करते आहे का, असा प्रश्न अनेक राजकीय विश्लेकांना सध्या पडलेला आहे. गेल्या काही काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मोठे नेते भाजपामध्ये येताना दिसतायेत. अशा स्थितीत भाजपा 2029 साली स्वबळावर निवडणुका लढवून सरकार आणण्याच्या तयारीत आहे का, याची चर्चा सुरु झालीय.

भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे,धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप भाजपावासी झालेत त्यात आता जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल लवकरच कमळ हाती घेणार आहेत. त्यामुळं या चर्चांना उधाण आलेलं आहे. परभणीतील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर मंगळवारी भाजपात प्रवेश करतायेत.

भाजपा स्वबळाच्या तयारीत

जपात बड्या नेत्यांचं जे इनकमिंग सुरु आहे, ते 2029 मधील स्वबळाची तयारी असल्याचं बोललं जातंय
जे जे नेते भाजपावासी झालेत तिथं बहुतांश महायुतीतील मित्रपक्षांचे आमदार आहेत . त्यामुळं भाजपानं काँग्रेसचे बडे नेते गळाला लावत 2029 साठी आत्तापासूनच तयारी केल्याचं दिसून येतंय. ज्या भागात भाजपाची ताकद कमी होती, त्या ठिकाणी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपाला मदत झाली. मात्र भाजपाला राज्यात चांगलं यश संपादित करता आलं. आता हीच संख्या स्वबळावर सत्तेत नेण्यापुरती करण्याचा भाजपाचा संकल्प दिसतोय.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर जबाबदारी?

2029 साली स्वबळावर राज्यात भाजपाची सत्ता येण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसह मित्रपक्षांचे आमदार, माजी आमदारही गळाला लावण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. कोकणात रवींद्र चव्हाण यांनी मिळवलेल्या यशानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात भाजपात येणाऱ्या मोठ्या नेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय.

विरोधकांचं भाजपावर टीकास्त्र

भाजपामध्ये इनकमिंग होत असताना विरोधक मात्र त्यांच्यावर टीका करताना दिसतायेत. कैलास गौरट्यांल यांच्या भाजपा प्रवेशाबाबत काँग्रेस नेत्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलत असल्याची टीका केली आहे. अशा नेत्यांना जनता त्यांची जागा दाखवेल, असंही काँग्रेस नेते सांगतायेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांत भाजपाला मोठं यश- बावनकुळे

तर दुसरीकडे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळेल असा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्यातआगामी निवडणुकांमध्ये महायुतीचेच उमेदवार निवडून येतील, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलंय. विदर्भात आणि राज्यभरात विरोधकांचा सुपडा साप होईल अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

शतप्रतिशत भाजपासाठी प्रयत्न

शतप्रतिशत भाजपच्या दृष्टीने पावले टाकली जातायेत, हे स्पष्टपणे दिसतंय. काँग्रेसनं 60 वर्षांच्या सत्ताकाळात देशाची वाट लावली, अशी टीका भाजप नेत्यांकडून सातत्यानं केली जाते. मात्र आता त्याच काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये मानाचं स्थान दिलं जातंय. शतप्रतिशत भाजपसाठी या बाहेरून घेतलेल्या आयारामांचा फायदा होणार की तोटा हे पहावं लागणार आहे.