अजितदादा गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद दुसऱ्यांदा धोक्यात आले आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने मंगळवारी माणिकराव कोकाटे हे सदनिका घोटाळाप्रकरणी दोषी असल्याचा प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत त्यांची दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही कायम ठेवली होती. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बुधवारी माणिकराव कोकाटे हे राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद पुन्हा एकदा हातातून निसटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद जाणार ?
बनावट कागदपत्रांचा वापर करून सरकारी सदनिका बेकायदेशीरपणे मिळवल्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावण्यात आलेली दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयाने कायम ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. न्यायालयाच्या आदेशानंतर कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. मंत्री कोकाटे यांच्या जामिनाला विरोध करणाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात कागदपत्रे सादर केली आहेत. राज्य परिषदेत पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री कोकाटे हे चर्चेत आले. त्यांच्या राजीनाम्याच्या तीव्र मागणीनंतर, त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले आणि नंतर क्रीडा खाते देण्यात आले.





