मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा भारतातील पहिला सहा-लेनचा आधुनिक द्रुतगती महामार्ग असून महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीत त्याचे मोठे योगदान आहे. या मार्गामुळे मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांतील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. वाहतुकीची सोय वाढल्याने उद्योग, व्यापार, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्राला नवी गती मिळाली आहे. तसेच, या महामार्गाने राज्यातील वाहतूक व्यवस्थेत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू केला आहे.
सुरक्षितता आणि वेग यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या मार्गामुळे महाराष्ट्रातील आर्थिक केंद्रे अधिक जवळ आली आहेत आणि विकासाचे नवे दार उघडले आहे. अशा परिस्थितीत या महामार्गाचे आगामी काळात विस्तारीकरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालकांसाठी खुशखबर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई–पुणे दरम्यान एक नवीन समांतर द्रुतगती महामार्ग उभारण्याची महत्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
मुंबई-पुणे प्रवास अवघ्या 90 मिनिटांत ?
प्रस्तावित समांतर द्रुतगती महामार्ग सुमारे 130 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या महामार्गासाठी अंदाजे 15 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या दीड तासांत म्हणजेच सुमारे 90 मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना राष्ट्रीय महामार्ग या दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी, पावसाळ्यात आणि अपघात झाल्यास प्रवाशांना तासन्तास अडकून पडावे लागते. नव्या समांतर द्रुतगती महामार्गामुळे हा वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास एनएचएआयकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नव्या द्रुतगती मार्गाचा कसा होईल फायदा ?
नवीन द्रुतगती महामार्ग केवळ प्रवासाचा वेळ कमी करणार नाही, तर मुंबई–पुणे औद्योगिक पट्ट्याच्या विकासालाही मोठी चालना देणार आहे. आयटी, ऑटोमोबाईल, लॉजिस्टिक्स आणि इतर उद्योगांना याचा थेट फायदा होणार आहे. तसेच लोणावळा, खंडाळा यांसारख्या पर्यटनस्थळांकडे जाणारा प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित होईल. या महामार्गावर अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था, वेग नियंत्रण प्रणाली, आपत्कालीन सेवा, तसेच दर्जेदार रस्ते पायाभूत सुविधा उभारले जाणार आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा 94.6 किमी लांबीचा महामार्ग नवी मुंबईतील कलंबोळीपासून पुण्याजवळील किवळेपर्यंत पसरलेला आहे. हा महामार्ग 2002 मध्ये सुरू झाला. दरवर्षी या मार्गावरील वाहतुकीत 5 ते 6 वाढ होत आहे. सध्या एक्सप्रेसवेवरील 13 किमी मिसिंग लिंक प्रकल्प सुरू असून यात खंडाळा घाटातील 10-लेन विभागाचाही समावेश आहे. नवीन विस्तार योजना उर्वरित भागासाठी आहे. या विस्तारामुळे दोन्ही शहरांदरम्यान प्रवासाचा वेळ कमी होईल आणि ट्रॅफिक जामच्या समस्येपासून देखील वाहनधारकांची सुटका होईल.





