PNGRB ने १ जानेवारी २०२६ पासून PNG आणि CNG दरात कपात जाहीर केली असून, नवीन दर पद्धतीमुळे लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महागाई वाढत असताना नव्या वर्षाची पहाट सर्वसामान्य लोकांना दिलासा घेऊन येणार आहे. कोट्यवधी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. घरगुती गॅस (PNG) आणि वाहनांसाठी लागणारे सीएनजी (CNG) यांच्या किंमती कमी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. CNG चे दर सतत बदलत असतात. मात्र PNG च्या दरात याआधी 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
नववर्षात CNG-PNG च्या दरात कपात होणार !
देशातील कोट्यवधी गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) ने गॅसच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. यामुळे 1 जानेवारी 2026 पासून CNG आणि घरगुती पाईप नॅचरल गॅस म्हणजेच PNG च्या किमतीत 2 ते 3 रुपये प्रति युनिटने घट होईल. PNGRB चे सदस्य ए.के. तिवारी यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते, या नवीन दर रचनेमुळे वाहतूक क्षेत्राला आणि स्वयंपाकघराला थेट फायदा होणार आहे.
या सवलतीचे मुख्य कारण म्हणजे गॅस वितरणाच्या दर रचनेत केलेला बदल. असे तिवारी यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वी गॅसच्या किंमती तीन वेगवेगळ्या अंतरावर आधारित झोनवर (200 किमी, 1200 किमी आणि त्याहून अधिक) अवलंबून होत्या. आता हे झोन कमी करून फक्त दोन केले आहेत. नवीन व्यवस्थेनुसार, झोन-1 साठी दर 54 रुपये निश्चित करण्यात आला आहे. पूर्वी हा दर 80 रुपये आणि काही ठिकाणी 107 रुपयांपर्यंत होता. हा सरळ सोपा बदल संपूर्ण भारतात लागू होईल.
CNG आणि PNG चे ग्राहकांसाठीचे मोठे महत्व
CNG आणि PNG हे पर्यावरणपूरक, स्वस्त आणि सुरक्षित इंधन म्हणून ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. CNG मुळे वाहनांचे इंधन खर्च कमी होतो तसेच पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत कमी प्रदूषण होते. त्यामुळे शहरातील हवा स्वच्छ ठेवण्यास मदत मिळते. PNG मुळे घरगुती स्वयंपाक अधिक सोपा, सुरक्षित आणि वेळ वाचवणारा ठरतो. सिलिंडर बदलण्याची झंझट नसल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळतो. CNG-PNG चा वापर वाढल्याने आयातीवरचा खर्च कमी होतो आणि देशाची ऊर्जा सुरक्षितता मजबूत होते. त्यामुळे सामान्य नागरिक, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांना मोठा फायदा होतो.





