Wed, Dec 31, 2025

3 Idiots 2 होणार? माधवन म्हणाला ‘मूर्खपणा’, आमिर म्हणाला…

Published:
2009 मध्ये प्रदर्शित झालेला राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट आजतागायत बॉलीवूडच्या सर्वाधिक यशस्वी आणि प्रभावी चित्रपटांपैकी एक मानला जातो. आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांनी साकारलेली तीन मित्रांची ही कथा आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे.
3 Idiots 2 होणार? माधवन म्हणाला ‘मूर्खपणा’, आमिर म्हणाला…

3 Idiots 2 : ‘3 इडियट्स’च्या संभाव्य सिक्वलवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेला राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट आजतागायत बॉलीवूडच्या सर्वाधिक यशस्वी आणि प्रभावी चित्रपटांपैकी एक मानला जातो. आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांनी साकारलेली तीन मित्रांची ही कथा आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. त्यामुळे या तिघांना पुन्हा एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा कायम आहे. मात्र आता कलाकारांनी दिलेल्या ताज्या प्रतिक्रियांनी या चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

आर माधवन काय म्हणाला

सुभाष के. झा यांना दिलेल्या मुलाखतीत आर. माधवन यांनी सिक्वलविषयी स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले की ‘3 इडियट्स’चा सिक्वल नक्कीच आकर्षक ठरू शकतो, पण आता त्यांची अवस्था, वय आणि पात्रांची गरज यांचा विचार करता हे योग्य ठरणार नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ते स्वतः दिग्दर्शक राजकुमार हिरानींसोबत पुन्हा काम करायला उत्सुक आहेत, मात्र ‘3 इडियट्स’चा सिक्वल करणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल. त्यांच्या मते, आता ते तिघेही त्या तरुण विद्यार्थ्यांच्या भूमिकेसाठी योग्य राहिलेले नाहीत, त्यामुळे कथानकाचे वास्तव आणि प्रभाव हरवू शकतो.

आमिर खानचे मत वेगळच (3 Idiots 2)

दुसरीकडे आमिर खान यांनी एक वेगळीच भूमिका मांडली आहे. त्यांनी सांगितले की ते सिक्वल करायला तयार आहेत आणि त्यांना ती कल्पना आवडते. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक लोकप्रिय पात्रांपैकी रॅंचो हे एक असून आजही लोक त्याचा वारंवार उल्लेख करतात, ही गोष्ट त्यांना आनंद देते. मात्र त्यांनी हेही उघड केले की त्यांना अद्याप कोणत्याही निर्मात्याकडून किंवा दिग्दर्शकाकडून सिक्वलसाठी संपर्क साधला गेलेला नाही. पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान त्यांना भरपूर आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले आणि पुन्हा एक संधी मिळाली तर ते सहजतेने तयार होतील असेही नमूद केले. 3 Idiots 2

‘3 इडियट्स’ हा तीन मित्रांच्या आयुष्यातील संघर्ष, स्पर्धात्मक शिक्षण प्रणाली, स्वप्नांच्या धडपडी आणि समाजाने लादलेल्या अपेक्षांवर भाष्य करणारा चित्रपट होता. भारतीय प्रेक्षकांवर या कथानकाचा प्रचंड प्रभाव पडला होता. या चित्रपटाने भारतात 202.47 कोटींची कमाई केली होती, तर जागतिक पातळीवर त्याने सुमारे 350 कोटींचा व्यवसाय केला. अनेक वर्षे हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आघाडीवर राहिला.

या चित्रपटात आमिर, माधवन आणि शर्मन व्यतिरिक्त करीना कपूर खान, बोमन इरानी आणि मोना सिंह यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या अभिनयाने आणि कथानकातील संदेशाने ‘3 इडियट्स’ला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. सध्या माधवनच्या नकारात्मक भूमिकेमुळे चाहत्यांची आशा काहीशी धूसर झाली आहे, तर आमिरच्या उत्सुकतेमुळे अजूनही थोडी आशा जिवंत आहे. मात्र प्रत्यक्षात सिक्वल होणार की नाही, हे दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि निर्मात्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे.