Mumbai-Goa National Highway : गणेशोत्सव सण अगदी तोंडावर आला आहे, या सणात कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई, पुण्याकडून आपल्या गावी जातात. मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात कोकणवासियांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळं चाकरमानी आपल्या गावी वेळेवर पोहचू शकत नाहीत, यावर राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक हितास्तव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वजनक्षमता 16 टन व 16 टनापेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988च्या कलम 155 मधील तरतूदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे.
किती दिवस जड वाहनांना बंदी…
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून ते 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत जड वाहनांना वाहतूक बंदी असणार आहे. यामध्ये अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे. तसेच 5 व 7 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून रात्री 11 वाजेपर्यंत, अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणपती विसर्जन, परतीचा प्रवासाकरिता 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजपासून ते 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत जड वाहतूकीस बंदी राहील.
कोणत्या वाहनांना सूट…
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने – आण करणाऱ्या वाहनांनाही ही बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी. हे निर्बंध जेएनपीटी बंदर ते जयगड बंदर येथून आयात- निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषधे, लिक्वीड मेडीकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाहीत. तसेच
7 सप्टेंबरनंतर वाहनांना परवानगी
महामार्गावर बंदी असलेल्या कालावधी व्यतिरिक्त उर्वरित कालावधीत ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त आहे, अशा वाहनांना 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजतापासून ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत, 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजतापासून ते 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत आणि सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजतापासून ते 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूकीस परवानगी राहील. तसेच सर्व वाहनांना 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजल्यानंतर नियमित वाहतूकीस परवानगी असेल.





