राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी आता केंद्रीय पातळीवर सुरू झाली आहे. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) या केंद्रीय संस्थेने या घटनेचा तपास आपल्या हाती घेतला असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडेही सादर केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातून ही माहिती अधिकृतपणे कळवण्यात आली आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांचे स्पष्टीकरण
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार,
विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) तपास प्रक्रिया सुरू केली असून विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार तपास करण्यात येत असून, ही प्रक्रिया पारदर्शक आणि कालमर्यादेत पूर्ण केली जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अपघाताशी संबंधित तांत्रिक नोंदी, ऑपरेशनल माहिती तसेच घटनास्थळावरील सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जात आहे. भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या चौकशीसाठी महाराष्ट्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार असून, अंतिम चौकशी अहवाल राज्य सरकारलाही दिला जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांची नेमकी मागणी काय होती?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते की, अजित पवार यांच्यासारख्या वरिष्ठ आणि अनुभवी नेत्याचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून, या दुर्घटनेत एकूण चार जणांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे हा अपघात नेमका कशामुळे घडला, याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात अधोरेखित केले होते.





