CM Devendra Fadnavis : महादेवी हत्तीण गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आले आहे. यावरुन कोल्हापूरात जनता रस्त्यावर उतरली आहे. महादेवी हत्तीणीला परत आणण्यात यावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन माधुरी हत्तीणीला आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे, यासाठी आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे म्हणाले.
यावेळी बैठकीस खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विश्वजीत कदम, आमदार सतेज पाटील, सदाभाऊ खोत, माजी खासदार राजू शेट्टी, नांदणी मठाचे पूज्य स्वस्तीश्री जिनसेन महास्वामीजी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी आदी उपस्थित होते.
सरकारही कोर्टात जाणार – मुख्यमंत्री
महादेवी हत्तीन राज्यात परत आली पाहिजे, ही सर्वांची इच्छा आहे, महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेणार असून, तसेच महादेवी हत्तीनीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचे पथक तयार करणार आहे. नांदणी मठाने याचिका दाखल करावी, सोबत सरकारीही याचिका दाखल करणार आहे. हत्तीनीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल, तसेच रेस्क्यू सेंटर आणि आहार याबाबतही सरकार आपल्या याचिकेत कोर्टाला आश्वस्त करेल, 34 वर्षापासून माधुरी हत्तीन ही नांदणी मठामध्ये होती. ती परत आली पाहिजे. ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीत यांनी म्हटले आहे.
हत्तीणीला आणण्यासाठी सरकार सकारात्मक…
राज्य सरकार नांदणी मठासोबत असेल, अशी सकारात्मक भूमिका सरकारने घेतली आहे. आणि लोकभावना लक्षात घेत महादेवी हात्तीन परत यावी, यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. आणि जी काय गरज व मदत लागेल, ती मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी दर्शवली आहे. जनभावना लक्षात घेत आज मुख्यमंत्र्यांनी महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी बैठक घेतली. तसेच नांदणी मठाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करावी. हे एक सकारात्मक पाऊल राज्य सरकारचे आहे, असे म्हणावे लागेल. असे बैठकीनंतर खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अन्यथा अंबानींच्या घरावर मोर्चा काढू
बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, जे हत्ती गुजरातला उपचारासाठी पाठवले होते. त्यातील चारहून अधिक हत्ती हे मृत्यूमुखी पावलेले आहेत. मग जर हे हत्ती मारणार असतील तर हत्ती यांच्याकडे कशासाठी पाठवायचे? हा खरा सवाल आहे, असं माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेटटी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील चार हत्ती तिथे गेलेले आहेत तसेच कर्नाटकातील ही चार हत्ती परत मिळत नाहीत. आणि याकडे आम्ही कानाडोळा करून पाहणार नाही, अशी आम्हाला खात्री मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. वेळ पडली तर आम्ही अंबानीच्या घरावर मोर्चा काढू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.





