MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

हरिद्वारसाठी निघाले, पाण्याची बाटली घ्यायला नाशिक स्थानकात उतरले; रेल्वेतून पडल्याने मृत्यू

Written by:Smita Gangurde
Published:
धावती लोकल किंवा एक्स्प्रेसमध्ये चढू नये असं वारंवार सांगूनसुद्धा प्रवासी जीव धोक्यात घालतात. यातून अनेकांना जीव गमवावा लागतो.
हरिद्वारसाठी निघाले, पाण्याची बाटली घ्यायला नाशिक स्थानकात उतरले; रेल्वेतून पडल्याने मृत्यू

मुंबईजवळील मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडल्याने 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये 11 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. दररोज मुंबईत लोकल अपघातात 7 प्रवाशांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली असताना नाशिक रोड स्थानकात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हरेश खेमचंद उदासी असं प्रवाशाचं नाव आहे.

पाण्याची बाटली घेण्यासाठी खाली उतरले अन्…

कल्याणहून हरिद्वार यात्रेसाठी निघालेल्या या प्रवाशाचा अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती पाण्याची बाटली घेण्यासाठी नाशिक रोड स्थानकावर उतरला. त्यातच रेल्वे सुरू झाली. धावत्या ट्रेनमध्ये चढताना हरेश खेमचंद यांचा हात सटकला आणि ते खाली पडले.  प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाडीच्या दरम्यान अडकल्याने त्यांच्या डोक्याला, छातीला आणि हाताला गंभीर मार लागला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यापारी हरेश खेमचंद उदासी (वय 55) त्यांची पत्नी मेनका हरेश उदासी (वय 49) आणि मुलगा हीरेन हरेश उदासी (वय 21) तसेच त्यांचे इतर 18 नातेवाईक आज 9 जून रोजी सकाळी कल्याणहून हरिद्वारच्या गाडीमध्ये बसले. कल्याण स्टेशनहून निघालेली ट्रेन साधारण 11 ते 12 च्या दरम्यान नाशिक स्टेशनवर आली. यावेळी पाण्याच्या बाटलीसाठी हरेश ट्रेनमधून खाली उतरले. मात्र पुन्हा चढताना हात घसरून ते ट्रेनखाली आले. यात ते गंभीर जखमी झाले होते.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित केलं…

हरेश खेमचंद उदासी यांना नागरिकांच्या आणि सीआरपीएफच्या मदतीने तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. महाराष्ट्रात एकाच दिवशी मुंब्रा आणि नाशिकमधील दोन घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.