ठाणे – ठाण्याच्या महापौर पदासाठी अनेक नावांची चर्चा असताना कोपरीमधील नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आलीये. महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून शर्मिला पिंपळोलकर यांच्या व्यतिरिक्त पक्षातून कोणीच अर्ज दाखल न केल्याने या पदावर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर दुसरीकडे भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय मागे घेतला असून सत्तेत सामील होत उपमहापौर पदी कृष्णा पाटील यांची वर्णी भाजपने लावली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत आता शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असे अनेक वर्षांचे समीकरण पुन्हा पाहायला मिळणार आहे.
महायुतीत रंगली होती चुरस
ठाणे महापालिका निवडणुकीनंतर ठाण्याच्या महापौर पदासाठी कमालीची चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे या पदासाठी अनेक नावांची चर्चा पालिका वर्तुळात सुरु होती. महापौर पदाच्या शर्यतीत वागळे इस्टेटमधून दर्शना जानकर, वर्तकनगर मधून विमल भोईर तसेच पद्मा भगत यांची नावे आघाडीवर होती. त्यामुळे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी या पदासाठी कोण अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र काही वेळातच ही सर्व नावे मागे पडली आणि कोपरीमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. पिंपळोलकर यांच्याशिवाय या पदासाठी कोणीच अर्ज दाखल न केल्याने त्यांची या पदासाठी अखेर बिनविरोध निवड झाली.
भाजप सत्तेत सहभागी, उपमहापौरपदी कृष्णा पाटील
उपमहापौर पदासाठी भाजपच्या कृष्णा पाटील यांनीच आपले नामनिर्देशन दाखल केले. त्यामुळे त्यांची देखील उपमहापौर या पदावर वर्णी लागली असून येत्या ३ फेब्रुवारी रोजी या दोन्ही पदांची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळाले आहे.
शिवसेनेचे ७५ नगरसेवक निवडून आले असून भाजपचे २८ नगरसेवक निवडणून आले आहेत. त्यामुळे महापौर पदी शिवसेनेचाच महापौर बसणार हे निश्चित झाले होते. अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे ७६ नगरसेवक झाले आहेत. शर्मिला या पिंपळोलकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या कोपरी-पाचपाखाडी परिसरातून निवडून आल्या असून त्यांची महापौर पदावर वर्णी लागल्याने कोपरीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?
ठाणे महापालिकेत महापौर तसेच उपमहापौर पद हे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार अडीच वर्ष दिले जाते. ठाणे महापालिकेत गेले अनेक वर्ष हाच फार्म्युला असताना या टर्ममध्ये मात्र पहिल्यांदाच महापौर तसेच उपमहापौर पद हे अडीज वर्षांवरून सव्वा सव्वा वर्ष असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. यावर भाजपने मात्र अधिकृत दुजोरा दिलेली नाही. तर ठाणे महापालिकेत योग्य पद मिळाले नाही तर विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपने आपला निर्णय बासनात गुंडाळला. ठाण्याच्या उपमहापौर पदी भाजपच्या कृष्णा पाटील यांची वर्णी लागली आहे. सत्तेत महत्वाचा वाटा मिळावा यासाठी महत्वाच्या समित्यांवरही भाजपने मागणी केली आहे. यामध्ये स्थायी समिती, परिवहन समिती,शिक्षण मंडळ ,विशेष समित्या तसेच प्रभाग समित्यांसाठीही भाजप आजही आग्रही आहे.





