सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, राष्ट्रवादीतून स्पष्ट संकेत, दोन दिवसांत निर्णय होणार

Written by:Smita Gangurde
Published:
सध्याच्या घडामोडी पाहता सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करून लवकरात लवकर पुढची प्रक्रिया करावी असा दादा गटाचा प्रयत्न दिसतोय. याबाबत राष्ट्रवादीच निर्णय घेईल असा पवित्रा भाजपने घेतला असला तरी या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिकाही महत्वाची राहणार आहे.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, राष्ट्रवादीतून स्पष्ट संकेत, दोन दिवसांत निर्णय होणार

मुंबई – अजित पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील, असे स्ष्ट संकेत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी दिलेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतली अनेक समीकरणं बदलणार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपद सुनेत्रा पवारांकडे जाईल असे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. दादांच्या अंत्यसंस्कारानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली आणि अन्य नेत्यांनी त्या सुरात सूर मिळवला. दादांच्या निधनाच्या धक्का मोठा असला तरी राष्ट्रवादीत पुढे काय याची चर्चा अपरिहार्य आहे. त्यामुळेच गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटले. सुमारे सव्वा तासाच्या या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी सगळे पत्ते खुले केले नाहीत. पण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होतील असे संकेत मात्र त्यांनी दिले.

उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना शनिवारी मुंबईत बोलावण्यात आलंय. आमदारांची विधिमंडळ नेता आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत मतं जाणून घेतली जाणार आहेत. लवकरच विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन नेता निवडला जाईल असं नेत्यांनी स्पष्ट केलंय. या पदावर सुनेत्रा पवारांची निवड होईल हे जवळजवळ निश्चित झालंय. त्यांनाच उपमुख्यमंत्री करावं अशी एकमुखी मागणी होऊ लागलीय. त्यामुळे त्यांचाच शपथविधी होईल हे आता निश्चित मानलं जातंय….

उपमुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आणखी कोण?

उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असताना काँग्रेसमधून स्वागत करण्यात आलंय… तर संजय राऊत यांनी एवढ्या लवकर अशी चर्चा करणं योग्य नाही असा संताप व्यक्त केला. राजकारणात काहीही होऊ शकतं.

त्यामुळे सुनेत्रा पवारांच्याऐवजी अन्य कुणाला उपमुख्यमंत्री करायचं ठरलं तर सुनील तटकरेंचं नाव समोर येऊ शकतं. याशिवाय राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊन निर्णय झाला तर जयंत पाटील उपमुख्यमंत्री होऊ शकतात असं राष्ट्रवादीतल्या काही आमदारांना वाटतं.

राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार?

राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवारांच्या निधनानंतर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आहे. प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महत्वाची भूमिका बजावू लागलेत. पवार कुटुंब बारामतीत शोकसागरात असताना मुंबईत सत्तेची पुढची गणितं सुरू आहेत. त्यामुळे विधिमंडळ पक्षनेता आणि उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय शनिवारीच झाला तर विलिनीकरणाच्या आधीच दादा गटातील नेत्यांचं पक्षावर वर्चस्व कायम राहील आणि सूत्रंही त्यांच्याकडेच राहतील.

प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार?

अशा परिस्थितीत प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल का याची चर्चा सुरू झालीय. अन्यथा सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त केलं जाऊ शकतं. विलिनीकरण झालं तर शरद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात किंवा सुप्रिया सुळेंच्या नावाचाही विचार होऊ शकतो.

बारामतीच्या जागेवर कोण लढणार?

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यास त्यांना सहा महिन्यात विधिमंडळ सदस्य म्हणून निवडून यावं लागेल. त्यामुळे उपमुख्यमंत्री झाल्यास सुनेत्रा पवार बारामतीतून विधानसभेची पोटनिवडणूक लढतील. पण त्या उपमुख्यमंत्री झाल्या नाहीत तर मात्र दादांचे पुत्र पार्थ किंवा जय यापैकी एकजण पोटनिवडणूक लढवू शकतो.
सुनेत्रा पवार राज्यात आल्यास राज्यसभेच्या त्यांच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. कारण त्यांच्या दोन पुत्रांपैकी एकाला ही संधी दिली जाणार का हा प्रश्न आहे.

केंद्रात कुणाला संधी मिळणार?

एकतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या नाहीत तर त्याच राज्यसभेत राहतील आणि त्यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णीही लागू शकते. त्या राज्यात आल्या तर पार्थ पवार किंवा जय पवार यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. विलिनीकरण झालं तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे पक्षाच्या केंद्रस्थानी येऊ शकतात.

भाजपची भूमिका महत्त्वाची

सध्याच्या घडामोडी पाहता सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करून लवकरात लवकर पुढची प्रक्रिया करावी असा दादा गटाचा प्रयत्न दिसतोय. याबाबत राष्ट्रवादीच निर्णय घेईल असा पवित्रा भाजपने घेतला असला तरी या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिकाही महत्वाची राहणार आहे. भाजपचं नेतृत्व आणि शरद पवार यांच्यात काही संवाद झाला तर मात्र राजकारण वेगळ्या वळणावर जाऊ शकतं. त्यामुळे पुढच्या काही तासांत ज्या घडामोडी घडतील त्या राष्ट्रवादीच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतील.