मुंबई- अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आता चर्चा आहे ती राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची. अजित पवार झेडपी निवडणुकांनंतर हे विलिनीकरण घडवून आणणार होते, असंही पुढे येतंय. अमोल कोल्हे, अंकुश काकडे हे शरद पवारांकडील नेते असोत की प्रफुल पटेल, झिरवाळांसारखे अजित पवारांकडील नेते यांनीही एकत्रीकरणाबाबत सकारात्मकच संकेत दिलेत. मात्र, प्रश्न हा उरतो की एकत्रित राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाचं
अजित पवार यांचं निधन झालं आणि राज्याच्या राजकारणातील एक अध्याय संपला. भाजपसोबत महायुतीत येऊन उपमुख्यमंत्री झालेल्या दादांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकत, त्या पक्षाचंच नेतृत्व आपल्याकडे घेतलं. मात्र, गेल्या काही काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून नेत्यांची झालेले गळती, निवडणुकांमध्ये झालेली पिछेहाट यामुळे त्या राष्ट्रवादीतून एकत्रिकरणाचे संकेत दिले जात होते.
नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींना मिळालेला जबर तडाखा, पुण्यातील , पिंपरी-चिंचवडमध्ये संपलेलं वर्चस्व, यामुळे आता दोन्ही पक्ष स्वतंत्र ठेवण्यात अर्थ नाही, याचीही जाणीव दोन्हीकडे झाली होती. यामुळेच, झेडपी निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं अजित पवार-शरद पवारांकडून निश्चित झालं होतं. त्यासाठी दादांनी १४ बैठका घेतल्याचंही पुढे आलं.मात्र, अजित दादांचं अपघाती निधन झालं आणि फक्त दोन परिवार, दोन पक्षांनाच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का बसला. मुख्य म्हणजे राष्ट्रवादी एकीककरणाचे आयामच बदलले. कारण, तांत्रिकदृष्ट्या ज्या मूळ राष्ट्रवादीचे नेते दादा होते तेच वारले आणि दुसऱ्या फळीतील नेतृत्व उरले तर दुसरीकडे, शरद पवारांची राष्ट्रवादी कमकुवत असताना मात्र शरद पवार तिथं असल्यानं त्यांच्या ज्येष्ठत्वाचा प्रभाव आता या एकत्रिकरणावर पडलाय.
राष्ट्रवादीचं एकत्रीकरण…संतुलन बदललंय!
अजित पवार हयात असताना ते उपमुख्यमंत्री होते. सत्तेत असलेल्या त्यांच्या पक्षाकडे मंत्रीपदं, आमदार, खासदार आणि नगरपरिषदेतील कामगिरी याची जमापुंजी होती व आहे. अजित पवार हा त्या पक्षाचा चेहरा होता. शरद पवारांना तांत्रिकदृष्ट्या ते समांतर होते. राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होताना दादांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांची राष्ट्रवादी सामावली जाईल, असं गृहितक होतं. म्हणजेच, अजित पवारांचं नेतृत्व नव्या रचनेत प्रमुख ठरलं असतं.
अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत होती व आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी दादांच्या राष्ट्रवादीत आल्यास महायुतीतील समावेशाबाबत प्रश्न नव्हता. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार व अन्य नेते यांना अजित पवारांच्या नेतृत्वात मार्गक्रमणा करावी लागली असती
अजित पवार हयात नसतानाची स्थिती
दादांच्या निधनानंतर ‘तुतारी’वाल्या राष्ट्रवादीचं वजन शरद पवारांमुळे साहजिकच मोठं ठरतं. दादांच्या राष्ट्रवादीत शरद पवारांइतरा मोठा नेता नाही. अनेक नेते मुळात पवारांना मानणारे आहेत. आता एकत्रीकरण झाल्यास पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे की शरद पवार-सुप्रिया सुळेंकडे, हा कळीचा मुद्दा आहे. सुनेत्रा पवार आमदार, गटनेत्या, उपमुख्यमंत्री होतील का, याहून महत्वाचा मुद्दा त्या आपल्या पक्षाचं नेतृत्व अजित दादांप्रमाणे स्वत:कडे ठेवणार का? हा आहे. अजित पवारांनी आधी पार्थ आणि नंतर सुनेत्रा यांच्या राजकीय उदयासाठी प्रयत्न केले होते, राष्ट्रवादीचं नेतृत्व मिळण्याची तर थेट अपेक्षा व्यक्त केली होती. यातूनच, पुढे सर्व राजकीय नाट्य घडलं. सुनेत्रा पवार या सर्व इतिहासाला मागे सोडून, एकत्रीकरणाला कशा प्रकारे स्वीकरणार ते महत्त्वाचं. सुनेत्रा पवार, जय-पार्थ आणि शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यातील सामंजस्य हाच एकत्रित राष्ट्रवादीचा पाया असेल.
भाजपची भूमिका महत्त्वाची
या सर्व मुद्यांच्या जोडीला काही बाह्य राजकीय मुद्देही आहेत. अजित पवार भाजपच्या महायुतीत सामील झाले. उपमुख्यमंत्री झाले. पुढील लोकसभा-विधानसभा निवडणुकांना ३ वर्षांचा अवधी आहे. राष्ट्रवादीला जनतेने प्रतिसाद दिला नाही, हे किमान निकालाचे आकडे दाखवतात. दादांसोबतचे नेते सत्तेला सरावलेले आहेत. अशा स्थितीत एकत्र राष्ट्रवादी अजित दादांच्या भूमिकेनुसार सत्तेत राहणार की शरद पवारांच्या भूमिकेनुसार विरोधात, हाही मुद्दा आहेच. यातही सत्तेत सहभाग कायम राहिल्यास शरद पवारांचं नेतृत्व की सुनेत्रा पवारांचं, हे भाजपसाठीही महत्त्वाचं आहे. दुसरीकडे, दादांच्या राष्ट्रवादीत सुनेत्रा पवारांनी पक्षाचं नेतृत्व करावं, उपमुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी वाढताना दिसतेय. तसं झाल्यास, सुनेत्रा पवारांचं नेतृत्व सुप्रिया आणि रोहित पवार कसं स्वीकारतील, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल.





