MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

Crime News: आधी अत्याचार मग कपडे पळवले; सांगलीत तरूणीसोबत भयंकर घडलं !

Written by:Rohit Shinde
Published:
सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे इयत्ता आठवीत शिकणार्‍या शाळकरी मुलीवर दोघा जणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime News: आधी अत्याचार मग कपडे पळवले; सांगलीत तरूणीसोबत भयंकर घडलं !

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे इयत्ता आठवीत शिकणार्‍या शाळकरी मुलीवर दोघा जणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईश्वरपूर पोलिसांनी या प्रकरणी सराईत गुन्हेगार ऋतीक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. संतापजनक म्हणजे अत्याचारानंतर पीडितेचे कपडे घेऊन दोघांनी पळ काढल्याने तिला जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत विवस्त्र चालत जावे लागले. दोघा नराधमांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. इथं एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी सामूहिक अत्याचार केला आहे. दोन्ही आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. आरोपींनी पीडित मुलीचं अपहरण करून तिला गावाजवळील एका शेतात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडितेचे कपडे घेऊन पळ काढला. यामुळे मुलीला विवस्त्र अवस्थेत शहरापर्यंत पायपीट करावी लागली आहे.

सराईत आरोपींना पोलिसांकडून अटक

ही घटना सांगलीच्या ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अमानुष अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे (दोघे रा. खांबे मळा, कामेरी रस्ता, ईश्वरपूर) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या दोघांविरुद्ध अपहरण, बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे. मंगळवारी रात्री ९च्या सुमारास ही घटना घडली.

तरुणी आणि अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार ही समाजासाठी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब ठरत आहे. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुटुंब, शाळा, सार्वजनिक ठिकाणे तसेच ऑनलाईन माध्यमांवरही मुली सुरक्षित नसल्याचे चित्र दिसून येते. कायदे कडक असतानाही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पोलिस यंत्रणा, प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. मुलींमध्ये आत्मविश्वास, कायद्याची माहिती आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. महिलांची सुरक्षितता हीच सक्षम आणि सशक्त समाजाची खरी ओळख आहे.