Budget 2026 : अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? समजून घेऊया

Published:
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य होते. परंतु पहिल्या पंधरा मिनिटांतच महाराष्ट्रातील हस्तकला आणि हातमाग उद्योगांसाठी मोठी आनंदवार्ता मिळाली .
Budget 2026 : अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं? समजून घेऊया

Budget 2026 । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य होते. परंतु पहिल्या पंधरा मिनिटांतच महाराष्ट्रातील हस्तकला आणि हातमाग उद्योगांसाठी मोठी आनंदवार्ता मिळाली . गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या आयात शुल्कामुळे आणि अमेरिकेने लावलेल्या टॅरिफमुळे सोलापूर, मालेगाव, नाशिकसह अनेक जिल्ह्यांतील हस्तकला उद्योगाला मोठा फटका बसला होता. मात्र आजच्या बजेट घोषणांमुळे या क्षेत्राला पुन्हा नवसंजीवनी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

हस्तकला आणि हातमाग उद्योगाला चालना

हस्तकला आणि हातमाग उद्योगाला चालना देण्यासाठी नॅशनल हँडलूम प्रोग्रामला अधिक बळ दिले जाणार असून यामध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्रोद्योगांना प्राधान्य मिळणार आहे. या अंतर्गत कौशल्यवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान, डिझाइन इनोव्हेशन आणि थेट बाजारपेठेशी जोडण्याचे उपक्रम राबवले जाणार आहेत. टेक्सटाईल्स एक्सपान्शन योजनेद्वारे देशातील उत्पादन क्षमता वाढवण्याचा आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील लघुउद्योगांना मोठा आधार देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे.

अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर लावलेल्या टॅरिफमुळे मराठी हातमाग आणि हस्तकला उद्योग अडचणीत आला होता. निर्यात घटल्याने हजारो कुटुंबांची उपजीविका धोक्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने बजेटमध्ये जाहीर केलेल्या योजनांमुळे या उद्योगाला नव्या बाजारपेठा, आर्थिक मदत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून पुन्हा एकदा वाढीला चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे.

मुंबई पुणे हायस्पीड रेल्वे – Budget 2026

अर्थमंत्री सीतारमण यांनी देशभरात सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या योजनेत महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक ठरणारा मुंबई–पुणे हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प समाविष्ट करण्यात आला आहे. या कॉरिडॉरमुळे मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख आर्थिक व शैक्षणिक केंद्रांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून, आयटी, उद्योग, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत देशभरातील १,३३७ रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात असून, त्यापैकी १,१९७ स्थानकांवर प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या शहरांतील रेल्वे स्थानकांचा या योजनेत समावेश असून, स्थानकांचे आधुनिकीकरण, प्रवासी सुविधांचा विस्तार, डिजिटल सेवा आणि व्यापारी विकासाला गती मिळणार आहे.