भारतातील लाखो तरुणांचे रेल्वेत नोकरी मिळविण्याचे स्वप्न असते. कारण, रेल्वे ही देशातील सर्वात मोठ्या आणि स्थिर सरकारी नियोक्त्यांपैकी एक आहे. रेल्वेतील नोकरी सुरक्षित, प्रतिष्ठित आणि दीर्घकालीन करिअर देणारी मानली जाते. यात नियमित पगार, वेळेवर बढती, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा, निवासव्यवस्था आणि प्रवास सवलती असे अनेक फायदे मिळतात.
विविध शैक्षणिक पात्रतांनुसार तांत्रिक, गैर-तांत्रिक, लिपिकीय, सुरक्षा, अभियांत्रिकी अशा अनेक पदांची संधी उपलब्ध असते. स्थिरता, भविष्यकालीन सुरक्षितता आणि कुटुंबासाठी असलेल्या सुविधांमुळे तरुणांना रेल्वेची नोकरी आकर्षक वाटते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा आता रेल्वेकडून मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
22,000 पदांसाठी भरती होणार
केंद्र सरकारच्या नोकरीत सामील होण्याच्या महत्त्वाकांक्षेने वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे विभागाने सुमारे 22,000 हून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. देशभरातील सुमारे 22,000 हून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. विशेषतः 10वी पास झालेल्यांसाठी असलेल्या या दुर्मिळ संधीबद्दल संपूर्ण माहिती येथे पाहूया.
रेल्वे भरती बोर्डाने जारी केलेल्या माहितीनुसार, लेव्हल-1 मधील पॉइंट्समन (Pointsman), सहाय्यक (Assistant) आणि ट्रॅक मेंटेनर (Track Maintainer) यांसारख्या विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. संपूर्ण भारतात अंदाजे 22,000 रिक्त पदे असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार, मूळ मासिक पगार 18,000 रुपये निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय इतर भत्तेही दिले जातील.
शैक्षणिक पात्रता काय आवश्यक?
या नोकरीच्या संधीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची शैक्षणिक पात्रता.
• मान्यताप्राप्त शाळेतून 10वी (मॅट्रिक / SSLC) उत्तीर्ण असणे पुरेसे आहे.
• किंवा, आयटीआय (ITI) पूर्ण केलेले आणि राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र (NAC) असलेले उमेदवारही या नोकरीसाठी सहज अर्ज करू शकतात.
या जाहिरातीबाबतची अधिक सविस्तर माहिती तुम्हाला रेल्वे रिक्रुटमेंच बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळू शकते. या भरतीसाठी संगणक आधारित चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, प्रमाणपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी असे अनेक टप्पे उमेदवारांना पार पाडावे लागणार आहेत.





