राष्ट्रवादी विलीनीकरणाची तारीख ठरली होती! शरद पवारांनी केला मोठा खुलासा

Published:
गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती आणि १२ तारखेला त्यावर अंतिम निर्णय जाहीर होणार होता. या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील हे दोघे करत होते.
राष्ट्रवादी विलीनीकरणाची तारीख ठरली होती! शरद पवारांनी केला मोठा खुलासा

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत मागील काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा सुरू होत्या. अजित पवार यांची स्पष्ट इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र यावी. त्या इच्छेनुसार १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्ष एकत्र येऊन विलीनीकरण जाहीर करणार होते, असा मोठा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. दोन्ही पक्ष एक व्हावेत ही अजित पवारांची इच्छा होती आणि तीच आमचीही भूमिका असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले शरद पवार

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांनी अनेक महत्त्वाच्या बाबी उघड केल्या. गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती आणि १२ तारखेला त्यावर अंतिम निर्णय जाहीर होणार होता. या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील हे दोघे करत होते. सर्व बैठका आणि संवाद या दोघांनीच हाताळले होते. मात्र अचानक घडलेल्या घटनेमुळे या प्रक्रियेला खंड पडल्याचं शरद पवारांनी सांगितलं. १२ फेब्रुवारीची तारीख अजित पवारांनीच निश्चित केली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजितदादांची मनापासूनची इच्छा होती आणि ती पूर्ण व्हावी अशी आमचीही भावना असल्याचं त्यांनी नमूद केलं.

सुनेत्राचा शपथविधी मला माहितीच नाही

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत विचारणा करण्यात आली असता शरद पवारांनी स्पष्ट आणि थेट भूमिका मांडली. सुनेत्रा पवार यांच्याशी या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. आज शपथविधी होणार आहे याचीही मला माहिती नव्हती, असं पवार म्हणाले. सुनेत्रा पवारांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असून त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचाच आहे, असं शरद पवार म्हणाले.