MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

गाजलेला मराठी चित्रपट ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार; रक्तरंजित संघर्षाच्या कहाणीत सयाजी शिंदे मध्यवर्ती भूमिकेत

Written by:Rohit Shinde
Published:
गावच्या भाऊबंदकीतून आणि श्रेयवादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये विकोपाला गेलेला वाद आणि त्यातून कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विष्णूबाळाने केलेला रक्तरंजित संघर्ष ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे.
गाजलेला मराठी चित्रपट ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार; रक्तरंजित संघर्षाच्या कहाणीत सयाजी शिंदे मध्यवर्ती भूमिकेत

गावच्या भाऊबंदकीतून आणि श्रेयवादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये विकोपाला गेलेला वाद आणि त्यातून कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विष्णूबाळाने केलेला रक्तरंजित संघर्ष ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. २००१ साली ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ हा मराठी चित्रपट आला होता. त्यानंतर आता नव्या रूपात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे मराठीसह तमिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. २००१ च्या चित्रपटात सयाजी शिंदे यांच्यासोबत अनेक मात्तबर कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. आता पुन्हा एकदा नव्या कलाकारांच्या संचात हा चित्रपट भव्य स्वरूपात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.

‘तांबव्याच्या विष्णूबाळा’ची घोषणा

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेता सयाजी शिंदे यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रत्येक भूमिका अगदी लीलया साकारणारे सयाजी शिंदे यांनी त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे. आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत नुकतीच त्यांनी ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या महत्त्वपूर्ण चित्रपटाची घोषणा केली आहे. सयाजी शिंदे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असणार आहेत.

चित्रपटाची कथा सत्यघटनेवर आधारीत

सातारा जिल्ह्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या तांबवे गावातील विष्णू बाळा पाटील यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून उलगडणार आहे. सत्यघटनेवर आधारलेल्या, रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. ‘विश्वविनायक सिनेमॅटिक सफारी फिल्म एलएलपी प्रोडक्शन’ बॅनरअंतर्गत येणाऱ्या ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या चित्रपटाचे लेखन अरविंद जगताप यांचं असून दिग्दर्शन अनुप जगदाळे करणार आहेत.

या चित्रपटाचे निर्माते मनोहर जगताप आहेत. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. सातारच्या ग्रामीण भागात घडलेल्या या सूडनाट्याचा थरार जनसामान्यांना अचंबित करणारा असणार आहे, त्यामुळे हा चित्रपट नव्याने प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या भरभरून दाद मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.