MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

मराठा आंदोलन शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणींची घेतली भेट, नागरी सेवा-सुविधांची केली मागणी

Written by:Astha Sutar
Published:
शिष्टमंडळाने केलेल्या सूचना व मागण्या यांचा योग्य विचार करुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे भूषण गगराणी यांनी सांगितले. शिष्टमंडळातील सदस्यांनी या नागरी सेवा-सुविधांबाबत समाधान व्यक्त करुन पालिकेचे आभार मानले.
मराठा आंदोलन शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणींची घेतली भेट, नागरी सेवा-सुविधांची केली मागणी

Maratha Reservation – मुंबईत गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताहेत. आज त्यांचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे. तर दुसरीकडे आंदोलनाची मुंबईतील गर्दी कमी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे, दरम्यान, आज मराठा समाजाच्या शिष्ठमंडळाने आंदोलनाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळामध्ये निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, ॲड. आशीषराजे गायकवाड, ॲड. रमेश ठुबे-पाटील, ॲड. हिमांशू पाटील, ऍड. आनंदराव काटे, ॲड. गौरव भालसिंग आदी उपस्थित होते.

कोणत्या केल्या मागण्या?

दरम्यान, २९ ऑगस्ट २०२५ पासून आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांना आवश्यक असणाऱ्या नागरी सेवा-सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी, आंदोलकांच्या वतीने शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने केलेल्या सूचना व मागण्या यांचा योग्य विचार करुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे भूषण गगराणी यांनी सांगितले. शिष्टमंडळातील सदस्यांनी या नागरी सेवा-सुविधांबाबत समाधान व्यक्त करुन पालिकेचे आभार मानले. नागरी सेवा-सुविधांमध्ये वाढ व इतर मुद्यांबाबत सूचना, मागण्या केल्या.

कोणतेही गैरसमज होवू नये

आंदोलनकर्ते व महानगरपालिका प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय व सुसंवाद रहावा, कोणतेही गैरसमज होवू नयेत, यासाठी प्रमुख व्यक्तिंची नावे व संपर्क क्रमांक यांचे आदानप्रदानही करण्यात आले. दरम्यान, महानगरपालिकेच्या वतीने, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, शिष्टमंडळाने केलेल्या सूचना व मागण्या यांचा यथायोग्य विचार करुन, महानगरपालिका प्रशासनाच्या स्तरावर आवश्यक असलेली सर्व कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी आश्वस्त केले.

बंदूक घेऊन या… गोळ्या घाला…

मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणातून देऊ नये, असे छगन भुजबळ यांनी म्हटलंय. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आपण छगन भुजबळ यांना महत्त्व देत नाही. आता ही शेवटची आणि आरपारची लढाई आहे. सरकारी येऊ द्या… पोलीस येऊ द्या… प्रशासन येऊ द्या… बंदूक घेऊन या… गोळ्या घालून दे… मी मेलो तरी चालेल. पण इथून आरक्षण घेऊनच उठणार. आपल्या लेकरांसाठी आपल्या समाजासाठी मी आरक्षण घेणारच आहे. असं जरांगे पाटील म्हणाले. परंतु आपल्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होता कामा नये, कोणीही त्रास देऊ नये, असं आवाहन जरांगे-पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना केलं आहे.