हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही काँग्रेसमध्ये दाखल झाले. यावेळी प्रशांत जगताप यांना महाराष्ट्राच्या विचारधारेचे प्रतीक म्हणून “कोण होता शिवाजी?” हे पुस्तक भेट देण्यात आले. या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी भाजपच्या वचनपूर्ती न करण्याच्या धोरणावर टीका करत महाराष्ट्राच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा उपस्थित केला. या पक्षप्रवेशावेळी “प्रशांत दादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है” आणि काँग्रेस पक्षाचा विजय असो” यांसारख्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
अखेर प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आल्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा देणारे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र त्यात आज सकाळी ट्विस्ट पाहायला मिळाला. प्रशांत जगताप यांना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी ऑफर दिली. मात्र मी काँग्रेस पक्षातच प्रवेश करणार असल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितले.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रशांत जगताप म्हणाले…
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जगताप म्हणाले की, राजकारण सोडेल पण काँग्रेस सोडणार नाही कारण, हिमालया सारखा काँग्रेस पक्ष आजही उभा आहे म्हणून मी यात पक्ष प्रवेश करतोय. भाजप जातीवाद निर्माण करतंय त्यांच्या विरोधात माझी लढाई असल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले. देशात गुन्हेगरित पुणे शहराचा क्रमांक तसेच भ्रष्टाचारातदेखील पुण्याचा पहिला क्रमांक आणि हे शहर भाजपच्या ताब्यात आहे. देशात भाजपाला फक्त काँग्रेस टक्कर देऊ शकतो असा दावाही जगताप यांनी यावेळी बोलताना केला.
पवार कुटुंबातील सदस्यांमुळे घडलो; जगतापांची भावना
काँग्रेसपक्षात जाहीर प्रवेश करण्यापूर्वी जगताप यांनी एक्सवर एक पोस्ट करत आपण अजितदादा, सुप्रिया सुळे आणि शरद पवा याच नेत्यांमुळे मी कार्यकर्ता म्हणून घडल्याचे सांगितले. तसेच दोन दिवसांपूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदसत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर विविध माध्यमांकडून माझ्या प्रतिक्रिया घेतल्या गेल्या. यापैकी कोणत्याही प्रतिक्रियेत मी माझे श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्र पवार, सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल काहीही तक्रार केलेली नाही. याच नेत्यांमुळे मी कार्यकर्ता म्हणून घडलो, त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात कालही आदर होता, आजही आहे आणि यापुढेही अनंत काळ आदरच असणार असल्याचे नमुद केले होते.
पुरोगामी विचारांच्या वाटचालीला नवी दिशा…
शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारावर निरंतर वाटचाल करणे, या वैचारिक पायावर समतावादी समाज घडवणे हे एक कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी आजपासून मी “काँग्रेस” पक्षात कार्यरत होत आहे.…
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) December 26, 2025





