Fri, Dec 26, 2025

Mumbai Jogeshwari Terminus : मुंबईकरांसाठी नवीन रेल्वे टर्मिनस; कधीपासून सुरू होणार

Published:
मुंबईच्या पश्चिम रेल्वे लाईनवर एक नवीन टर्मिनस उभारण्यात येत आहे. हे टर्मिनस जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर उभारले जात आहे. जोगेश्वरी टर्मिनसचा पहिला टप्पा जून 2026 मध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
Mumbai Jogeshwari Terminus : मुंबईकरांसाठी नवीन रेल्वे टर्मिनस; कधीपासून सुरू होणार

Mumbai Jogeshwari Terminus : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर येतेय. मुंबईच्या पश्चिम रेल्वे लाईनवर एक नवीन टर्मिनस उभारण्यात येत आहे. हे टर्मिनस जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर उभारले जात आहे. जोगेश्वरी टर्मिनसचा पहिला टप्पा जून 2026 मध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल 30 वर्षानंतर मुंबईला एक नवं रेल्वे टर्मिनस मिळत आहे. जोगेश्वरी रेल्वे टर्मिनस मुळे मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सोपा आणि जलद होणार आहे.

कुठे उभारण्यात येणार नवे टर्मिनस (Mumbai Jogeshwari Terminus)

जोगेश्वरी टर्मिनस हे मुंबईतील पश्चिम रेल्वेचे चौथे रेल्वे टर्मिनस ठरणार आहे. जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळील सध्याच्या सहाय्यक टर्मिनल (एटी) यार्डमध्ये हा प्रकल्प विकसित केला जात आहे. आतापर्यंत केवळ गाड्या उभ्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या यार्डमध्ये प्रवासी वाहतूक नव्हती. मात्र, टर्मिनस सुरू झाल्यानंतर प्रवाशांसाठी ते गेमचेंजर ठरेल. जोगेश्वरी येथील रेल्वे टर्मिनस कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईतून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना आणखी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

जोगेश्वरी टर्मिनसचा पहिला टप्पा जून 2026 मध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र कंत्राटदार बदल, जागेसंबंधी अडचणी आणि प्रशासकीय कारणांमुळे कामात उशिर झाला. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 76.48 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. Mumbai Jogeshwari Terminus

दुसरा टप्पा कधी सुरू होणार

जोगेश्वरी टर्मिनसच्या पहिल्या टप्प्यात दोन प्रवासी प्लॅटफॉर्मसह पूर्ण विकसित कोचिंग टर्मिनस उभारण्यात येणार आहे, यातील एक प्लॅटफॉर्म एक स्टेशनच्या बाजूला असेल आणि दुसरा दोन रुळांच्या मध्ये असेल. या दोन नवीन प्लॅटफॉर्म मुळे एकाच वेळी तीन लांब पल्ल्याच्या गाड्या हाताळणे शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्यात दररोज 12 जोड्या लांब पल्ल्यांच्या गाड्या चालवण्याची क्षमता असेल. दुसरा टप्पा मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त प्लॅटफॉर्म, पिट लाइन आणि शंटिंग नेक उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यानंतर जोगेश्वरी टर्मिनसवरून दररोज 24 लांब पल्ल्यांच्या गाड्या धावतील. मुंबईच्या रेल्वे वाहतुकीसाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा असणार आहे.